बुधवार, मार्च २८, २००७

तुम्ही काय करता अश्या वेळी?

एकेक दिवस सगळ्याचच कंटाळा येतो!!!
आजचा दिवसच वाईट गेला एकूणातच. मी एका गोष्टीची बरेच दिवस वाट पहात होते ती इतक्यात होणार नाही हे कळलं.
सकाळी सकाळी अभ्यासाला बसले तर परि़क्षा अगदीच तोंडावर आलेली असूनही आपल्याला काहीही येत नाहीये हा साक्षात्कार झाला.
त्यात ऐन परिक्षेच्या तोंडावर पेटी बिघडली आहे. आणि ती परिक्षेपर्यंत दुरुस्त होऊ शकणार नाही हे ही समजलं. आता पेटीशिवाय मी कसा अभ्यास करणार आहे परिक्षेचा??
सगळा दिवस खराब करून आता संध्याकाळी लक्षात येतंय की चिडचिड करून काहीच फायदा होणार नाहीये. कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आहे.
तुम्ही काय करता असं frustration आलं की? इतका साठून आलेला कंटाळा घालवायचे उपाय सांगेल का कोणी मला?

मंगळवार, मार्च ०६, २००७

एकांत

एकांत तसा आपल्याला एकटा कधीच भेटत नाही
जेव्हा जेव्हा भेटतो, सोबत आणतोच काही ना काही

एकांत कधी हळवा, सोबत ठेवणीतल्या आठवणी
क्षणात हलकेच हसू, तर क्षणात डोळ्यात पाणी
आठवणींच्या गावातून मग परत येताच येत नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कधी एकांत कातरवेळी हूरहूर सोबत घेऊन येतो,
सरत्या क्षणांच्या गडद सावल्या मानामधे ठेवून जातो
मनाचे दिवे उजळले तरी हूरहूर मात्र शमत नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कधी एकांत बोलका होतो, शब्दांचं मग चांदणं होतं
एक शब्द उच्चारला तरी त्याचंसुद्धा गाणं होतं
गाण्यच्या त्या स्वरांची साथ मग सुटत नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कधी एकांत दोघांचा होऊन दोन मनं सांधू लागतो
एकेका स्वप्नाची काडी घेऊन प्रेमाचं घरटं बांधू लागतो
स्वप्नांच्या त्या घरट्यातून मन बाहेर येतच नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कुणही सोबत आला तरी त्याचं एकच सांगणं असतं
एकांत काही क्षणांचाच - बाकी सोबतच जगणं असतं
त्या काही क्षणातच वेचावं स्वत:साठी थोडं काही
म्हणूनच तर एकांत एकटा कधी भेटत नाही

शुक्रवार, मार्च ०२, २००७

ऋतुरंग - ३

पावसाळ्यातली शिरशिरी आणाणारी थंडी संपून ऑक्टोबर हीटचा तडाखा संपला की खरीखुरी थंडी सुरू होते. गुलाबी थंडी वगैरे प्रकार काही मला कळत नाहीत पण कडाक्याची तंडी असली तरी मजाच येते. थड़ी सुरू होण्याच्या सुमाराला सबंध सह्याद्री अंगोपांगी फुललेला असतो. कोणत्याही घाटात, इतकंच काय अगदी सिंहगड, तळजाई वाघजाईला गेलं तरी इतक्या रंगांची आणि आकारांची फुलं फुललेली असतात की नजर ठरत नाही. रंगांची नुसती उधळण असते सगळीकडे. फुलांचे गालीचेच पसरलेले असतात जणू हिवाळ्याच्या स्वागतासाठी . नुसती फुलंच नाही , तर सगळ्याच गोष्टी निसर्ग अगदी भरभरून उधळत असतो.भरपूर विविधरंगी भाज्या, फळं सगळ्याचीच रेलचेल असते. पावासाळ्यातल्या सृष्टीचं नवपरिणीतेचं रूप जसं सुखावणारं असतं ना, तसंच हे परीपूर्ण रूपही तितकंच खुलून दिसतं.मग हळूहळू सगळं चैतन्य ओसरायला लागतं उन्हं चढायला लागतात आणि परत मोगर्‍याचे आणि आंब्याचे वेध लागातात!!!