रविवार, मे २४, २००९

क्षण एक पुरे

आज पुन्हा सोमवार. पुन्हा आठवड्याचं रुटीन सुरू झालंय. गेली ५ वर्षं वीकेंडनंतर सोमवारी ऑफीसला जाताना येणारा कंटाळा आणि आणि शुक्रवारी संध्याकाळी 'अरे! संपला पण आठवडा!' असं वाटणं आता अंगवळणीच पडलंय.पण मागच्या रविवारी मात्र उद्यापासून ऑफीसला जायचं ह्या कल्पनेने मी चांगलीच अस्वस्थ झाले होते. एक तर दहा महिन्यांची लांबलचक सुट्टी झाल्यामुळे सगळं रुटीन परत बसवायचं होतं. आणि आता फक्त माझं आणि नवर्‍याचंच नाही तर लेकीचं आणि पर्यायाने आईचं (म्हणजे माझ्या आईचं) पण रुटीन बदलणार होतं. लेकीला पाळणाघराची सवय मी आधीपासूनच लावली होती. पण त्याव्यतिरिक्त गेल्या ९ महिन्यात तिला घरी ठेवून मी कुठेच गेले नव्हते. त्यामुळे ती आपल्याला सोडून राहिल का? आईला जास्त त्रास तर देणार नाही ना? आई दिसत नाहिये म्हणून रडून गोंधळ घालेल का? असे शंभर प्रश्न मनात घेऊन काहीश्या अनिच्छेनेच मी ऑफीसला आले."मी मिहिकाला पाळणाघरात सोडलं की तुला फोन करीन. तोपर्यंत तू अजिबात फोन करू नको." अशी आईने सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे कमीतकमी दहा वेळा मी घरी फोन फिरवून रिंग वाजायच्या आधीच ठेवून दिला होती. शेवटी एकदा आईने फोन केला आणि ती नीट राहिली म्हणून सांगितलं, तेव्हा कुठे मला जरा हायसं वाटलं.
दुसर्‍या दिवशी मी ऑफीसला निघणार तेवढ्यात मिहिकाला सांभाळायला मदत करणार्‍या मावशींचा 'बरं नाही. कामाला येत नाही' असअ फोन आला. झालं. 'आता आई एकटी मिहिकाला कशी सांभाळेल? पाळणाघरापर्यंत कशी घेऊन जाईल? तिचं सगळं आवरून व्हायचं आहे अजून. आई एकटी काय काय करेल?' परत डोक्यात विचारचक्र सुरू."अगं तू कशाला टेंशन घेतेस? तुम्ही लहान असताना मी तुम्हा तिघांना सांभाळतच होते ना! मग आता काय एका पिल्लाला सांभाळू शकणार नाही का?" आई आपली माझी समजूत घालत होती. शेवटी सगळे विचार बाजूला ठेवून मी निघून गेले.
बुधवारी मावशी पण कामाला आल्या. आईने पण दुपारी 'मिहिका व्यवस्थित राहिली. काही त्रास दिला नाही. पाळणाघरात पण हसत हसत गेली' असं सांगितल्यामुळे माझं टेंशन कमी झालं. 'आता होईल हळूहळू सवय' मला वाटलं. जराश्या निर्धास्तपणे मी कामाला सुरूवात केली. तोच पाळणाघरातून फोन "मिहिकाला १०२ ताप आहे. तुम्ही लगेच येऊन तिला घेउन जा." १०२ ताप आहे हे ऐकल्यावर मला काहीच सुचेना. मला ऑफीसमधून निघणं तर शक्यच नव्हतं. शिवाय तिच्या पाळणाघरात पोचेपर्यंत मला खूपच वेळ लागला असता. म्हणून मग मी आईला फोन करून तिला घेउन यायला सांगितलं. आईने तिला आणून औषध देऊन 'ताप उतरलाय' सांगेपर्यंत माझा जीव थार्‍यावर नव्हता. ऑफीसमधे वेड्यासारखं रडायलाच यायला लागलं. कशासाठी मी नोकरी करते? खरंच माझ्या पिल्लाला, माझ्या आईला त्रास देऊन काय मिळवते आहे मी? इतकं अपराधी वाटलं मला! त्याक्षणी सगळं सोडून घरी निघून जावसं वाटायला लागलं.नोकरी सोडणं मला कितीही वाटलं तरी प्रॅक्टीकली शक्य नाही हे समजत होतं. नक्की काय करावं? काय केलं म्हणजे सगळ्यांना कमीतकमी त्रास होईल? मिहिका मोठी होईपर्यंत हे असंच चालणार का? ती मोठी झाल्यावर तिला असं वाटेल का की आईने आपल्यापेक्षा स्वतःच्या करीअरकडे जास्त लक्ष दिलं? रात्रभर मी असाच उलटसुलट विचार करत होते.
गुरुवारी मतदानाची सुट्टी होती म्हणून बरं वाटत होतं. सहजच चॅनल बदलता बदलता झी मराठी वर सारेगमप चालू दिसलं. नाहीतरी त्या आठवड्याचे भाग मी बघितलेच नव्हते म्हणून बघत बसले. अमृता नातूने 'या चिमण्यांनो' सुरू केलं. मुळात ते गाणंच अतिशय सुंदर आहे. आणि अमृताने खरंच त्यादिवशी अगदी काळजातून सूर लावला होता. त्यावेळची माझी मनःस्थिती पण तशीच होती. अक्षरशः अंगावर काटा आला! पंडितजींनी तिचं कौतुक केलं तेव्हा तिला जे भरून आलं ना ती संवेदना माझ्या आतपर्यंत खोलवर पोचली. तिची मनाची उलघाल, तिला दोन पिल्लांना पाळणाघरात ठेवून तिथे येताना काय वाटलं असेल - जणू काही माझ्याच मनातल्या भावना कोणीतरी मला दृश्य स्वरूपात उलगडून दाखवतंय असं वाटत होतं.आणि पंडितजींनी इतकं सुंदर समजावलं तिला. त्या क्षणी ते मलाच समजावत आहेत असं मला वाटायला लागलं! त्यांच्या प्रत्येक वाक्यातून मला जणू माझ्या ओढाताणीचा अर्थ मला कळत होता. पंडितजी जेव्हा म्हणाले ना, "ही तुमची तप:श्चर्या आहे. तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका" तेव्हा अगदी मनापासून भरून आलं. अर्थात माझी नोकरी म्हणजे अगदी तप:श्चर्या वगैरे म्हणण्याइतकी नक्कीच नाही. पण त्यांच्या त्या शब्दांनी, त्या एका क्षणाने माझी उलघाल मात्र संपवली. अगदी
आता मला खरंच वाटतंय - सगळं सुरळीत होईल. थोडा वेळ लागेल पण सगळं नीट होईल. माझी लेकही जेव्हा मोठी होईल तेव्हा माझी ही सगळी धडपड समजून घेईल. तेवढे प्रगल्भ संस्कार मी नक्कीच करू शकेन असा आता विश्वास वाटतो!

(ही पोस्ट मी २७ एप्रिलला लिहिली होती)