शुक्रवार, डिसेंबर २९, २००६

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

बघता बघता वर्ष संपून गेलं
अनुभवाचं केवढं दान देऊन गेलं....
कितीदा हसवलं, कितीदा रडवलं,
कधी प्रेमाने फुलवलं, तर कधी रागाने तुडवलं...
कधी अभिमानाने मान ताठ झाली,
तर कधी शरमेने शिर झुकवलं......
सगळी दु:खं, चिंता, कटू आठवणी
सरत्या वर्षाला देऊन
सौख्य आणि समाधान सोबत घेऊन
नवीन वर्षाचं स्वागत करू या!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गुरुवार, नोव्हेंबर ०२, २००६

पेन्सिल

ऑफीसमधे कसलातरी वर्कशॉप होता. म्हणून त्याच्या सुरुवातीला सगळ्यांना नोटपॅड आणि पेन्सिल दिली. पेन्सिलीचे जोडीदार म्हणजे टोकयंत्र, खोडरबर वगैरे माझ्याजवळ असणं शक्यच नव्हतं. म्हणून तिथेच ऑफीसमधूनच नवीन टोकयंत्र घेतलं आणि ती कोरी पेन्सिल कोर्‍या टोकयंत्राने तासायला घेतली. टोक करताना मस्त सलग पापुद्रा निघाला. तो बघताना मन कधी उडून मागे गेलं ते समजलंच नाही.
बालवाडीत असताना ताईची वही-पेन्सिल बघून मला कधी एकदा पहिलीत जाते असं झालं होतं. मला बालवाडीत फक्त पाटी आणि पेन्सिल वापरायला परवानगी होती. ताईचें अक्षर खूपच सुंदर होतं. तर मला वाटायचं की ती शिसपेन्सिलने लिहिते म्हणून तिचं अक्षर सुंदर येतं. पुढे मी पेन्सिल वापरायला लागल्यावर मला ही समजूत किती चुकीची आहे ते कळलं. पण त्या समजुतीमध्ये माझी बालवाडीची वर्षं अक्षराचं दु:ख न होता निघून गेली :)
पहिलीत गेल्यानंतर वह्या पेन्सिलींची खरेदी झाल्यावर मला इतका आनंद झाला होता! मग शळेच्या पहिल्या दिवशी आईनी मला दोन पेन्सिली छान टोक करून दिल्या होत्या. इतक्या गोड दिसत होत्या त्या पेन्सिली! पांढर्‍या रंगावर गुलाबी रंगाची फुलं, मागे सोनेरी टोपणात अडकवलेलं गुलबी खोडरबर आणि पुढे छान निमुळती टोकं... मी तर किती तरी वेळ बघतच बसले होते त्यांच्याकडे.
नंतर पेन्सिलने लिहायला सुरूवात झाल्यावर मात्र एकेक गमतीजमती सुरू झाल्या. तोपयंत फक्त पाटीवर लिहायची सवय असल्यामुळे मी शिसपेन्सिलीने लिहिलेलं सुद्धा चुकून हाताने पुसायची. आणि मग सगळी वही काळी होऊन जायची. आमचा शळेतल्या बाकांना पेन्सिल ठेवण्यासाठी पुढे एक खाच असायची. मि अगदी न चुकाता त्यात पेन्सिल ठेवात असे. आनि मग जरा हललं तरी बाकाला धक्का लागून ती पेन्सिल खली पडायची आणि टोक तुटून जायचं.मग परत टोक करणं हा माझा अगदी आअवडता छंद. कितीतरी वेळेला असं सारखं टोक करून मी एक दिवसात अख्खी पेन्सिल संपवलेली आहे. मग माझा पेन्सिल संपवण्याचा स्पीड बघून आईने मला शाळेत टोकयंत्र देणंच बंद करून टाकलं.
पेन्सिलला टोक केल्यानंतर त्याही जी फुलं निघायची (शाळेत असताना आम्ही त्याला पेन्सिलची फुलंच म्हणायचो) ती सगळी मी वहीत साठवून ठेवत असे. नंतर ती कार्डपेपरवर चिकटवून त्याला रंग दिला की अगदी मस्त दिसायची. नंतर मग चौथीपसून पेनाने लिहायला सुरूवात केल्यावर मग पेन्सिलच संबंध आकृती काढण्यापुरता राहिला. पण त्यातही परिक्षेत spirogyra, amoeba वगैरे मंडळींची आकृती कढताना त्यात ठिपके काढावे लागायचे. ते काढताना पेन्सिल पॅडवर आपटून त्याचा टकटक टकटक असा फार छान आवाज यायचा.
लहानपणी खरंच कसं सगळं निरागस असतं नाही. राग, अहंकार, भांडणं वगैरे सगळे पेन्सिलने लिहिल्यासारखं... सहज खोडता येण्यासारखं... मनात आलं अश्या सगळ्या मानसिक त्रास देणार्‍या गोष्टी पेन्सिलनेच मनात लिहून नंतर खोडून टकता आल्या तर किती मजा येईल!
आता एकूणच संगणकामुळे लिहिणं कमीच झालंय. त्यात पेन्सिलने तर अजिबातच लिहिलं जात नाही. पण वर्कशॉपच्या दिवशी मिळालेली ती पेन्सिल माझा आख्खा दिवस आनंदी करून गेली!!!

मंगळवार, ऑक्टोबर ३१, २००६

ग्रीष्माची चाहूल लागते दिवस हळूहळू लांबतात
मोगर्‍याच्या कळ्या फुलताना श्वास जागीच थांबतात
गंधाची ती नि:शब्द हाक अणि तुझ्या प्रेमाची पखरण
मनातल्या उन्हावरती जणू चांदण्याचं शिंपण

उन्हं थोडी कमी होतात, ढगांच्या कडा काजळू लागतात
आभाळ भरुन यायच्या आधीच मनात सरी कोसळू लागतात
झाडावरुन गळणारं पाणी, मनात पावसाची गाणी
सोबत सतत असतातच तुझ्या आठवणी

पाउस हळूहळू कमी होतो, वाटा सार्‍या धुक्यात हरवतात
शिशिरामधली सोनेरी उन्हं दवामधे भिजून जातात
बोचरी सकाळ आणि उबदार दुपार, सांजवेळ मात्र तुझीच असते
माझ्या मनात तुझ्या आठवणींना वसंताची नवी पालवी फुटते

दिवस कोणतेही असले तरी तुझी आठवण सोबत असते
ऋतुंच्या या खेळात मी स्वत:लाच हरवून बसते
पुन्हा तेच ऊन-वारे आणि गहिरी होणारी नाती
ऋतुचक्रासारखीच अक्षय तुझी नी माझी प्रीती

सोमवार, ऑक्टोबर १६, २००६

आभाळ दाटुनी येता, मन मोहरून जाते,
अन मनात दरवळतो आठवणींचा मरवा

झरझर झरती धारा, रान चिंब चिंब होते
चराचरात फुलतो नववधूचा गोडवा

भिजलेल्या अंधारातून ही साद कुठूनशी येते
ढगाआडुनी हसतो, पुनवेचा चांदवा

पाचूच्या शेल्यावरती इंद्रधनूची किनार खुलते
मेंदीने केशरी सजतो स्पर्श रेशमी हळवा

मनी दाटल्या आठवांची डोळ्यातून सर कोसळते
तरी मनात भरूनी उरतो ओला श्रावण हिरवा