मंगळवार, ऑक्टोबर ३१, २००६

ग्रीष्माची चाहूल लागते दिवस हळूहळू लांबतात
मोगर्‍याच्या कळ्या फुलताना श्वास जागीच थांबतात
गंधाची ती नि:शब्द हाक अणि तुझ्या प्रेमाची पखरण
मनातल्या उन्हावरती जणू चांदण्याचं शिंपण

उन्हं थोडी कमी होतात, ढगांच्या कडा काजळू लागतात
आभाळ भरुन यायच्या आधीच मनात सरी कोसळू लागतात
झाडावरुन गळणारं पाणी, मनात पावसाची गाणी
सोबत सतत असतातच तुझ्या आठवणी

पाउस हळूहळू कमी होतो, वाटा सार्‍या धुक्यात हरवतात
शिशिरामधली सोनेरी उन्हं दवामधे भिजून जातात
बोचरी सकाळ आणि उबदार दुपार, सांजवेळ मात्र तुझीच असते
माझ्या मनात तुझ्या आठवणींना वसंताची नवी पालवी फुटते

दिवस कोणतेही असले तरी तुझी आठवण सोबत असते
ऋतुंच्या या खेळात मी स्वत:लाच हरवून बसते
पुन्हा तेच ऊन-वारे आणि गहिरी होणारी नाती
ऋतुचक्रासारखीच अक्षय तुझी नी माझी प्रीती

सोमवार, ऑक्टोबर १६, २००६

आभाळ दाटुनी येता, मन मोहरून जाते,
अन मनात दरवळतो आठवणींचा मरवा

झरझर झरती धारा, रान चिंब चिंब होते
चराचरात फुलतो नववधूचा गोडवा

भिजलेल्या अंधारातून ही साद कुठूनशी येते
ढगाआडुनी हसतो, पुनवेचा चांदवा

पाचूच्या शेल्यावरती इंद्रधनूची किनार खुलते
मेंदीने केशरी सजतो स्पर्श रेशमी हळवा

मनी दाटल्या आठवांची डोळ्यातून सर कोसळते
तरी मनात भरूनी उरतो ओला श्रावण हिरवा