बुधवार, फेब्रुवारी २१, २००७

ऋतुरंग - २

उन्हाळा संपत आला की साधारण मे महिन्याच्या शेवटी शेवटी अचानक एखाद्या दिवशी आभाळ गच्च दाटून येत असे. वार्‍याबरोबर गोल गोल उडणारी धूळ, पाळापाचोळा डोळ्यात जायला लागला तरीही मग आमच्या उत्साहाला अगदी उधाण यायचं. वळवाचा पाऊस येणार म्हणून. हळूहळू टपोरे थेंब पडायला सुरूवात झाली की मातीच्या गंधाने अक्षरश: जीव वेडावून जात असे. आह! आत्ता हे लिहित असतानासुद्धा तो सुवास मला जाणवतो आहे. बर्‍याचदा वळवाच्या पावसात गारा सुद्धा पडत. अलिकडे बर्‍याच वर्षात पुण्यात असा गारांचा पाऊस झालेला मला आठवत नाही.
पावसाळ्याविषयी तर इतक्या जणांनी इतकं काही लिहिलं आहे! पण तरीही त्याबद्दल लिहिण्याचा मोह मी आवरू शकत नाही. पावसाच्या आठवणींचा प्रत्येकाकडेच अगदी कुबेरासारखा खजिना असेल. दर वर्षी पावसाळ्याची सुरुवातच शाळेच्या खरेदीने होत असे. नवीन पुस्तकं, वह्या, दप्तर, गणवेष, रेनकोट, पावसाळी चपला कितीतरी खरेदी करायची असायची. मग बाबा पुण्यात आले की आमची तिघांची खरेदी हा एक मोठा कार्यक्रम असायचा. इतर ऋतुंपेक्षा मला पावसाळा आवडतो त्याचं हे ही एक कारण असू शकेल. (मिरच्या कोथिंबिरीपासून ते अगदी गाडीपर्यंत काहीही खरेदी करणं हा माझा आवडता छंद आहे. त्याविषयी नंतर कधीतरी)
पावसाळा तर मला वेड लावणारा ऋतू आहे. पाऊस मग तो कसाही असला- रिमझिम, भुरभुर, सरीवर सरी, धो धो कोसळणारा तरीही मला त्याचा कधीच कंटाळा येत नाही. एखाद् दुसरा पाऊस पडायचा अवकाश, सगळीकडे हिरवी पाती तरारून येतात. इतक्या भाजून काढणार्‍या उन्हात तगून रहायचं आणि जीवनाचा एक थेंब मिळताच फुलून यायचं, कुठे मिळत असेल ही शक्ती ह्यांना?
पुणे मुंबई प्रवास पावसाळ्यात करणं म्हणजे स्वर्गसुख आहे. खंडाळ्याच्या घाटात सृजनाचा उत्सव चालू असतो. अगदी रस्त्यावर उतरलेले ढग, कड्यांवरून कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे, पावसाच्या धारांनी आणि धुक्याने धूसर झालेला आसमंत, आणि नजर व्यापून उरणारी हिरवाई.
मागच्या वर्षी पहिल्यांदाच स्वत:च्या गाडीतून केलेला पावसाळ्यातला प्रवास मी कधीच विसरणार नाही. गाडीच्या टपावर आणि काचांवर नाचणारा पाऊस, चकचकीत काळाशार रस्ता आणि गाडीत अखंड पावसाच्या गाण्यांची सोबत. प्रवास कधी संपला कळलंसुद्धा नाही. बाकी पावसाळ्यात लोणावळा, सिंहगड वगैरे ठिकाणी तर इतके वेळ गेलो आहे की त्याच्या आठवणी वेगळ्या काढणं केवळ अशक्य आहे.
तीन वर्षांपूर्वी जेव्हा काही दिवस मी मुंबईला होते, तेव्हा पावसाळ्यात मी मरिन ड्राईव्हला गेले होते. वरून हलकेच कोसळणारा पाऊस आणि उधाणलेला समुद्र यांनी अगदी आतून बाहेरून चिंब चिंब करून टाकलं.
मागच्या वर्षी पुण्यात अगदी मुसळधार पाऊस झाला. कितीतरी वेळा धरणाचे सगळे दरवाजे उघडून नदीत पाणी सोडलं होतं. ते बघायला जायला मुहूर्तच लागत नव्हता. अचानक एके दिवशी ऑफीसला जाताना कोसळणारा पाऊस बघून खडकवासल्याला जायचं ठरलं. धरणाचे नऊ दरवाजे उघडले होते. आणि प्रचंड वेगाने, रोरावत, उसळ्या घेत पाणी नदीत पडत होतं. त्यादिवशी अवाक् होणे या वाक्प्रचाराचा खरा अर्थ मला कळला. (त्यादिवशी ते पाणी बघत भिजत भिजत खाल्लेल्या वडापाव आणि भज्यांची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे.) पावसाचं नाव काढलं की ह्या दोन आठवणी अलगद माझ्या मनात उतरतात- पावसातल्या शुभ्र धुक्यासारख्या.

क्रमश:

मंगळवार, फेब्रुवारी २०, २००७

ऋतुरंग १

"ऊन वाढत चाललंय ना सध्या?"
"हो ना! कटकटच आहे बाई आता चार महिने उन्हाळा म्हणजे! मला इतका राग येतो ना उन्हाळ्याचा!" इति मैत्रिण.
मला कळेचना की इतका अगदी राग राग करण्यासारखं काय आहे उन्हाळ्यात? आणि ते ही पुण्याच्या उन्हाळ्याचा? मग विदर्भात वगैरे तर काय करेल ही बाई?प्रत्येक ऋतूचं स्वत:चं काही वैशिष्ट्य आहे तसा त्रासही असणारच. पण त्याचा त्रास आपण करून घेण्यात काय अर्थ आहे?
सगळीकडचं भयानक ऊन, पंचेचाळीसच्या जवळपास जाऊ पहाणारं तापमान, अंगाची लाही लाही हे सगळं सहन करून मी उन्हाळ्याला दोन गोष्टींसाठी अगदी माफ करू शकते - आंबा आणि मोगरा!!
अगदी लहानपणापासूनच माझ्या मनात उन्हाळ्याचं अगदी खास स्थान आहे. महाशिवरात्रीला दिवसभराचा उपास करून आम्ही सगळेजण संध्याकाळी उसाचा रस प्यायला जायचो. त्या मोसमातला पहिला रस! तेव्हापसूनच खरे उन्हाळ्याचे, वार्षिक परिक्षेचे आणि त्यानंतरच्या मोठ्या सुट्टीचे वेध लागलेले असायचे. परिक्षा संपून सुट्टी लगेपर्यंत ऊन चांगलंच तापायला लागलेलं असे. मग दररोज सकाळी ऊठून पर्वतीवर फिरायला जायचा कर्यक्रम अगदी ठरलेला असे. सकाळच्या सुखद गारव्यात पर्वतीवर फिरताना इतकं छान वाटायचं!
मग घरी येऊन भरपूर हुंदडून झालं की की मग दुपारी कोणाच्या तरी घरी जमून पत्ते, सागरगोटे, व्यापार असे बैठे खेळ खेळायलाही तितकीच मजा यायची. शिवाय बरोबर करवंदं, जांभळं, कैर्‍या, कलिंगड अश्या कितीतरी गोष्टींची रेलचेल असायची.
नंतर इंजिनीयरींगला गेल्यावर मला सर्वात वाईट कशाचं वाटलं तर उन्हाळ्याची सुट्टी अभ्यासात घालवावी लागणार ह्याचं! म्हणजे कल्पना करा की मस्त आमरस-पुरीचं जेवण झालंय. वरती माठातलं वाळ्याच्या वासाचं गार पाणी पिऊन झालंय. अश्यावेळी माणूस मस्त गरगर पंखा लावून ताणून देईल की पुस्तक घेऊन अभ्यास करत बसेल???उन्हाळ्याच्या सगळ्या आठवणींना मोगर्‍याचा गंध आहे असं वाटतं मला. मोगर्‍याच्या गंधाच्या तोडीस तोड जगात एकच गंध आहे तो म्हणजे पहिल्या पावसानंतरचा मृद्गंध! उन्हाळ्यातली रात्र, आसमंतात भरून राहिलेला मोगर्‍याचा दरवळ, टिपूर चांदणं आणि गचीवर जमलेली गप्पांची मैफिल. सुख सुख म्हणतात ते याहून वेगळं काय असणार!!

क्रमश:

मंगळवार, फेब्रुवारी १३, २००७

झीज

मी उभा होतो किनार्‍यावर
शांत, स्तब्ध, निश्चल
आणि एक तडाख्यात चिंब चिंब करून गेलीस तू....
वरवर तसं काहीच नाही बदललं
पण आतपर्यंत काहीतरी हललं नक्कीच
थोडंसं गूढ, तरी हवंहवंसं..
तू भरतीचं उधाण लेऊन येताना,
कोसळलीच तुझी आतुरता
आणि ओहोटीसंगे मागे फिरलीस ना,
तेव्हा जाणवली तुझी कासवीस नजर......
असह्यच झाला मला माझा निश्चलपणा!
आणि मग हळूहळू
कणाकणाने तुटत गेलो मी
आता इतरांनाही जाणवलाय बदल
लोक म्हणतात 'खडक झिजला किनार्‍याचा'
बरोबरच आहे, त्यांना कसं कळणार
आता माझा प्रवास अखंड तुझ्या सोबतच-
किनार्‍यावरची रेती होउन!!!

ह्या रुपयांबरोबर तुम्ही काय कराल?

ह्या रुपयांबरोबर तुम्ही काय कराल?

आज सकाळी ऑफीसला येताना रेडिओ मिरची लावण्याची दुर्बुद्धी का झाली मला? मी एकतर कधीही रेडिओ लावावासा वाटला की विविध भारतीच लावते. पण सकाळी विविध भारतीवरही 'चित्रलोग' नावाचा विचित्र कार्यक्रम असतो म्हणून मिरची लावायची वेळ आली. कसली चर्चा चालली होती कळलं नाही. पण त्या 'आर जे अनिरुद्ध' नावाच्या माणसाने '२८ कोटी रुपयांबरोबर तुम्ही काय कराल' अस प्रश्न विचारलेला ऐकून माझं डोकंच सटकलं.
एकूणच सध्याच्या 'मराठी' म्हणवून घेणार्‍या वाहिन्यांवरची मराठी भाषा ऐकणं कठीण आहे. सध्याच्या रिमिक्सच्या युगात थोडेफार इतर भाषांमधले शब्द वापरले जाणारच. अगदी शुद्ध साजूक तुपातल्या मराठीची अपेक्षा नक्कीच नाही. पण भाषेचे किमान नियम तरी पाळावेत हवेत की नाही??? सगळं स्क्रिप्ट आधी हिंदीमधे लिहून नंतर शब्दश: मराठीत भाषांतर केलंय असं वाटतं.
उदाहरणार्थ:'ह्या २८ कोटी रुपयांबरोबर तुम्ही काय कराल(इन रुपयोंके साथ आप क्या करेंगे?)
माझी मदत कर. (मेरी मदद करो)
तो मला बोलला (वो मुझे बोला) वगैरे वगैरे.
ही सगळी वाक्य खरं म्हणजे ह्या पैशांचं काय कराल, मला मदत कर, तो मला म्हणाला अशी असायला हवीत हे अभिनय करणार्‍या लोकांच्याही लक्षात येत नाही का? तमाम व्हीजे , आरजे मंडळींना कोणतीच भाषा शुद्ध का बोलता येत नाही? विशेषत: विविध भारती ऐकून नंतर मिरची वगैरे ऐकलं की हा फरक ठळकपणे जाणवतो.शुद्धलेखनविषयी तर न बोललेलंच बरं! काही दिवसांनी एकेकाळी 'शुद्धलेखनासाठी काही गुण राखून ठेवले आहेत' अशी सूचना असायची यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.सध्यातरी ह्या बाबतीत काही 'व्यापक कार्यक्रम' वगैरे सुचत नाहीये मला. पण किमान माझ्या ब्लॉगवर तरी शुद्ध मराठीत लिहिणं माझ्याच हातात आहे ना!

सोमवार, फेब्रुवारी १२, २००७

घरटं

ती

प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू
आणि नदीसारखी स्थिर, शांत मी
उन्मत्त वृक्षासारखा वादळाशी झुंजणारा तू
आणि जमिनीशी नातं जोडणारी मी
क्षितीजाच्यापार झेपावणारा तू
आणि किनार्‍यावरच वाळूचं घरटं जपणारी मी
'साथ देशील का' विचारतोयस खरा
पण भीती वाटते मला,हे सगळं कसं काय जमणार मला?
****
तो

कोसळणारा प्रपात दिसतो सगळ्यांना
पण कड्याच्या टोकापर्यंत शान्त वाहून
त्याला शक्ती देणारी नदीच असते ना?
वृक्ष जेव्हा झुंजतो वादळाशी
मुळं घट्ट धरून ठेवून
त्याला आधार देणारी जमीनच असते ना?
आणि वेडे,पक्षी क्षितिजापार झेपावला तरी
समुद्रावर थोडच विसावणार तो?
संध्याकाळी परतून यायला,घरटंच हवं ना त्याला?