मंगळवार, फेब्रुवारी २०, २००७

ऋतुरंग १

"ऊन वाढत चाललंय ना सध्या?"
"हो ना! कटकटच आहे बाई आता चार महिने उन्हाळा म्हणजे! मला इतका राग येतो ना उन्हाळ्याचा!" इति मैत्रिण.
मला कळेचना की इतका अगदी राग राग करण्यासारखं काय आहे उन्हाळ्यात? आणि ते ही पुण्याच्या उन्हाळ्याचा? मग विदर्भात वगैरे तर काय करेल ही बाई?प्रत्येक ऋतूचं स्वत:चं काही वैशिष्ट्य आहे तसा त्रासही असणारच. पण त्याचा त्रास आपण करून घेण्यात काय अर्थ आहे?
सगळीकडचं भयानक ऊन, पंचेचाळीसच्या जवळपास जाऊ पहाणारं तापमान, अंगाची लाही लाही हे सगळं सहन करून मी उन्हाळ्याला दोन गोष्टींसाठी अगदी माफ करू शकते - आंबा आणि मोगरा!!
अगदी लहानपणापासूनच माझ्या मनात उन्हाळ्याचं अगदी खास स्थान आहे. महाशिवरात्रीला दिवसभराचा उपास करून आम्ही सगळेजण संध्याकाळी उसाचा रस प्यायला जायचो. त्या मोसमातला पहिला रस! तेव्हापसूनच खरे उन्हाळ्याचे, वार्षिक परिक्षेचे आणि त्यानंतरच्या मोठ्या सुट्टीचे वेध लागलेले असायचे. परिक्षा संपून सुट्टी लगेपर्यंत ऊन चांगलंच तापायला लागलेलं असे. मग दररोज सकाळी ऊठून पर्वतीवर फिरायला जायचा कर्यक्रम अगदी ठरलेला असे. सकाळच्या सुखद गारव्यात पर्वतीवर फिरताना इतकं छान वाटायचं!
मग घरी येऊन भरपूर हुंदडून झालं की की मग दुपारी कोणाच्या तरी घरी जमून पत्ते, सागरगोटे, व्यापार असे बैठे खेळ खेळायलाही तितकीच मजा यायची. शिवाय बरोबर करवंदं, जांभळं, कैर्‍या, कलिंगड अश्या कितीतरी गोष्टींची रेलचेल असायची.
नंतर इंजिनीयरींगला गेल्यावर मला सर्वात वाईट कशाचं वाटलं तर उन्हाळ्याची सुट्टी अभ्यासात घालवावी लागणार ह्याचं! म्हणजे कल्पना करा की मस्त आमरस-पुरीचं जेवण झालंय. वरती माठातलं वाळ्याच्या वासाचं गार पाणी पिऊन झालंय. अश्यावेळी माणूस मस्त गरगर पंखा लावून ताणून देईल की पुस्तक घेऊन अभ्यास करत बसेल???उन्हाळ्याच्या सगळ्या आठवणींना मोगर्‍याचा गंध आहे असं वाटतं मला. मोगर्‍याच्या गंधाच्या तोडीस तोड जगात एकच गंध आहे तो म्हणजे पहिल्या पावसानंतरचा मृद्गंध! उन्हाळ्यातली रात्र, आसमंतात भरून राहिलेला मोगर्‍याचा दरवळ, टिपूर चांदणं आणि गचीवर जमलेली गप्पांची मैफिल. सुख सुख म्हणतात ते याहून वेगळं काय असणार!!

क्रमश:

२ टिप्पण्या:

Tulip म्हणाले...

उन्हाळ्याची चाहूल? अहाहाऽऽ.. आंबा आणि मोगरा.. वाहवा!! आत्ता स्नो ब्लिझार्डमधे हे वाचतानाच कसं उबदार वाटतय.

सुरेख पोस्ट अपर्णा!

Unknown म्हणाले...

व्वा.. मस्तच लिहीलय.. आणि ईंजिनिअरींगच्या कमेंटवर १००% अनुमोदन.. काय चिडचिड व्हायची उन्हाळ्यात अभ्यास करायला.. आता ईं. संपल्यावर उन्हाळ्याची सुट्टी परत njoy करीन म्हणते.. :)
अजुन सगळा ब्लॊग नाही वाचला..पण मस्तच लिहीत आहेस..