मंगळवार, फेब्रुवारी १३, २००७

ह्या रुपयांबरोबर तुम्ही काय कराल?

ह्या रुपयांबरोबर तुम्ही काय कराल?

आज सकाळी ऑफीसला येताना रेडिओ मिरची लावण्याची दुर्बुद्धी का झाली मला? मी एकतर कधीही रेडिओ लावावासा वाटला की विविध भारतीच लावते. पण सकाळी विविध भारतीवरही 'चित्रलोग' नावाचा विचित्र कार्यक्रम असतो म्हणून मिरची लावायची वेळ आली. कसली चर्चा चालली होती कळलं नाही. पण त्या 'आर जे अनिरुद्ध' नावाच्या माणसाने '२८ कोटी रुपयांबरोबर तुम्ही काय कराल' अस प्रश्न विचारलेला ऐकून माझं डोकंच सटकलं.
एकूणच सध्याच्या 'मराठी' म्हणवून घेणार्‍या वाहिन्यांवरची मराठी भाषा ऐकणं कठीण आहे. सध्याच्या रिमिक्सच्या युगात थोडेफार इतर भाषांमधले शब्द वापरले जाणारच. अगदी शुद्ध साजूक तुपातल्या मराठीची अपेक्षा नक्कीच नाही. पण भाषेचे किमान नियम तरी पाळावेत हवेत की नाही??? सगळं स्क्रिप्ट आधी हिंदीमधे लिहून नंतर शब्दश: मराठीत भाषांतर केलंय असं वाटतं.
उदाहरणार्थ:'ह्या २८ कोटी रुपयांबरोबर तुम्ही काय कराल(इन रुपयोंके साथ आप क्या करेंगे?)
माझी मदत कर. (मेरी मदद करो)
तो मला बोलला (वो मुझे बोला) वगैरे वगैरे.
ही सगळी वाक्य खरं म्हणजे ह्या पैशांचं काय कराल, मला मदत कर, तो मला म्हणाला अशी असायला हवीत हे अभिनय करणार्‍या लोकांच्याही लक्षात येत नाही का? तमाम व्हीजे , आरजे मंडळींना कोणतीच भाषा शुद्ध का बोलता येत नाही? विशेषत: विविध भारती ऐकून नंतर मिरची वगैरे ऐकलं की हा फरक ठळकपणे जाणवतो.शुद्धलेखनविषयी तर न बोललेलंच बरं! काही दिवसांनी एकेकाळी 'शुद्धलेखनासाठी काही गुण राखून ठेवले आहेत' अशी सूचना असायची यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.सध्यातरी ह्या बाबतीत काही 'व्यापक कार्यक्रम' वगैरे सुचत नाहीये मला. पण किमान माझ्या ब्लॉगवर तरी शुद्ध मराठीत लिहिणं माझ्याच हातात आहे ना!

1 टिप्पणी:

Yogesh म्हणाले...

सगळ्याच मराठी माध्यमांचे हिंदीकरण जोरदारपणे सुरु आहे. अगदी आपल्या नेहमीच्या वापरातले प्रेक्षक, पंतप्रधान, ईशान्य वगैरे शब्द जाऊन आता दर्शक, प्रधानमंत्री, पूर्वोत्तर वगैरे शब्द आता सगळ्या दूरदर्शन वाहिन्यांवर रुढ झाले आहेत.
मराठी म्हणून मिरवणार्‍या वाहिन्या सर्रास हिंदी-इंग्रजी जाहिराती दाखवतात. :(

रेडिओ मिरची वर तर मराठीत एक-दोन शब्द - उपकार केल्यासारखे आणि ते देखील अशुद्ध/चुकीचे - वापरतात.