उन्हाळा संपत आला की साधारण मे महिन्याच्या शेवटी शेवटी अचानक एखाद्या दिवशी आभाळ गच्च दाटून येत असे. वार्याबरोबर गोल गोल उडणारी धूळ, पाळापाचोळा डोळ्यात जायला लागला तरीही मग आमच्या उत्साहाला अगदी उधाण यायचं. वळवाचा पाऊस येणार म्हणून. हळूहळू टपोरे थेंब पडायला सुरूवात झाली की मातीच्या गंधाने अक्षरश: जीव वेडावून जात असे. आह! आत्ता हे लिहित असतानासुद्धा तो सुवास मला जाणवतो आहे. बर्याचदा वळवाच्या पावसात गारा सुद्धा पडत. अलिकडे बर्याच वर्षात पुण्यात असा गारांचा पाऊस झालेला मला आठवत नाही.
पावसाळ्याविषयी तर इतक्या जणांनी इतकं काही लिहिलं आहे! पण तरीही त्याबद्दल लिहिण्याचा मोह मी आवरू शकत नाही. पावसाच्या आठवणींचा प्रत्येकाकडेच अगदी कुबेरासारखा खजिना असेल. दर वर्षी पावसाळ्याची सुरुवातच शाळेच्या खरेदीने होत असे. नवीन पुस्तकं, वह्या, दप्तर, गणवेष, रेनकोट, पावसाळी चपला कितीतरी खरेदी करायची असायची. मग बाबा पुण्यात आले की आमची तिघांची खरेदी हा एक मोठा कार्यक्रम असायचा. इतर ऋतुंपेक्षा मला पावसाळा आवडतो त्याचं हे ही एक कारण असू शकेल. (मिरच्या कोथिंबिरीपासून ते अगदी गाडीपर्यंत काहीही खरेदी करणं हा माझा आवडता छंद आहे. त्याविषयी नंतर कधीतरी)
पावसाळा तर मला वेड लावणारा ऋतू आहे. पाऊस मग तो कसाही असला- रिमझिम, भुरभुर, सरीवर सरी, धो धो कोसळणारा तरीही मला त्याचा कधीच कंटाळा येत नाही. एखाद् दुसरा पाऊस पडायचा अवकाश, सगळीकडे हिरवी पाती तरारून येतात. इतक्या भाजून काढणार्या उन्हात तगून रहायचं आणि जीवनाचा एक थेंब मिळताच फुलून यायचं, कुठे मिळत असेल ही शक्ती ह्यांना?
पुणे मुंबई प्रवास पावसाळ्यात करणं म्हणजे स्वर्गसुख आहे. खंडाळ्याच्या घाटात सृजनाचा उत्सव चालू असतो. अगदी रस्त्यावर उतरलेले ढग, कड्यांवरून कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे, पावसाच्या धारांनी आणि धुक्याने धूसर झालेला आसमंत, आणि नजर व्यापून उरणारी हिरवाई.
मागच्या वर्षी पहिल्यांदाच स्वत:च्या गाडीतून केलेला पावसाळ्यातला प्रवास मी कधीच विसरणार नाही. गाडीच्या टपावर आणि काचांवर नाचणारा पाऊस, चकचकीत काळाशार रस्ता आणि गाडीत अखंड पावसाच्या गाण्यांची सोबत. प्रवास कधी संपला कळलंसुद्धा नाही. बाकी पावसाळ्यात लोणावळा, सिंहगड वगैरे ठिकाणी तर इतके वेळ गेलो आहे की त्याच्या आठवणी वेगळ्या काढणं केवळ अशक्य आहे.
तीन वर्षांपूर्वी जेव्हा काही दिवस मी मुंबईला होते, तेव्हा पावसाळ्यात मी मरिन ड्राईव्हला गेले होते. वरून हलकेच कोसळणारा पाऊस आणि उधाणलेला समुद्र यांनी अगदी आतून बाहेरून चिंब चिंब करून टाकलं.
मागच्या वर्षी पुण्यात अगदी मुसळधार पाऊस झाला. कितीतरी वेळा धरणाचे सगळे दरवाजे उघडून नदीत पाणी सोडलं होतं. ते बघायला जायला मुहूर्तच लागत नव्हता. अचानक एके दिवशी ऑफीसला जाताना कोसळणारा पाऊस बघून खडकवासल्याला जायचं ठरलं. धरणाचे नऊ दरवाजे उघडले होते. आणि प्रचंड वेगाने, रोरावत, उसळ्या घेत पाणी नदीत पडत होतं. त्यादिवशी अवाक् होणे या वाक्प्रचाराचा खरा अर्थ मला कळला. (त्यादिवशी ते पाणी बघत भिजत भिजत खाल्लेल्या वडापाव आणि भज्यांची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे.) पावसाचं नाव काढलं की ह्या दोन आठवणी अलगद माझ्या मनात उतरतात- पावसातल्या शुभ्र धुक्यासारख्या.
क्रमश:
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 टिप्पणी:
अपर्णा... सहज शब्दात फार छान लिहीतेस...
अहाहा!! वाचून पावसाच्या आठवणी मनात दाटून आल्या...
टिप्पणी पोस्ट करा