गुरुवार, ऑक्टोबर १५, २००९

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

बोलता बोलता दिवाळी सुरू पण झाली. सगळीकडे उत्साह नुसत उतू जातोय. जिकडे तिकडे दिवे, फटाके, रांगोळ्या, नवनवीन कपडॆ, वस्तू ह्यांची रेलचेल आहे. बाजारपेठ ओसंडून वाहतीये.(आणि गर्दी पण अर्थातच! :) )
आपणही सगळे ह्या तेजाच्या उत्सवात सामील होऊया! आणि ज्या घरात आणि ज्यांच्या जीवनातही अंधार आहे अश्या एका तरी घरात आणि मनात दीप उजळण्याचा प्रयत्न करूया!



सगळ्यांना दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा!

रविवार, मे २४, २००९

क्षण एक पुरे

आज पुन्हा सोमवार. पुन्हा आठवड्याचं रुटीन सुरू झालंय. गेली ५ वर्षं वीकेंडनंतर सोमवारी ऑफीसला जाताना येणारा कंटाळा आणि आणि शुक्रवारी संध्याकाळी 'अरे! संपला पण आठवडा!' असं वाटणं आता अंगवळणीच पडलंय.पण मागच्या रविवारी मात्र उद्यापासून ऑफीसला जायचं ह्या कल्पनेने मी चांगलीच अस्वस्थ झाले होते. एक तर दहा महिन्यांची लांबलचक सुट्टी झाल्यामुळे सगळं रुटीन परत बसवायचं होतं. आणि आता फक्त माझं आणि नवर्‍याचंच नाही तर लेकीचं आणि पर्यायाने आईचं (म्हणजे माझ्या आईचं) पण रुटीन बदलणार होतं. लेकीला पाळणाघराची सवय मी आधीपासूनच लावली होती. पण त्याव्यतिरिक्त गेल्या ९ महिन्यात तिला घरी ठेवून मी कुठेच गेले नव्हते. त्यामुळे ती आपल्याला सोडून राहिल का? आईला जास्त त्रास तर देणार नाही ना? आई दिसत नाहिये म्हणून रडून गोंधळ घालेल का? असे शंभर प्रश्न मनात घेऊन काहीश्या अनिच्छेनेच मी ऑफीसला आले."मी मिहिकाला पाळणाघरात सोडलं की तुला फोन करीन. तोपर्यंत तू अजिबात फोन करू नको." अशी आईने सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे कमीतकमी दहा वेळा मी घरी फोन फिरवून रिंग वाजायच्या आधीच ठेवून दिला होती. शेवटी एकदा आईने फोन केला आणि ती नीट राहिली म्हणून सांगितलं, तेव्हा कुठे मला जरा हायसं वाटलं.
दुसर्‍या दिवशी मी ऑफीसला निघणार तेवढ्यात मिहिकाला सांभाळायला मदत करणार्‍या मावशींचा 'बरं नाही. कामाला येत नाही' असअ फोन आला. झालं. 'आता आई एकटी मिहिकाला कशी सांभाळेल? पाळणाघरापर्यंत कशी घेऊन जाईल? तिचं सगळं आवरून व्हायचं आहे अजून. आई एकटी काय काय करेल?' परत डोक्यात विचारचक्र सुरू."अगं तू कशाला टेंशन घेतेस? तुम्ही लहान असताना मी तुम्हा तिघांना सांभाळतच होते ना! मग आता काय एका पिल्लाला सांभाळू शकणार नाही का?" आई आपली माझी समजूत घालत होती. शेवटी सगळे विचार बाजूला ठेवून मी निघून गेले.
बुधवारी मावशी पण कामाला आल्या. आईने पण दुपारी 'मिहिका व्यवस्थित राहिली. काही त्रास दिला नाही. पाळणाघरात पण हसत हसत गेली' असं सांगितल्यामुळे माझं टेंशन कमी झालं. 'आता होईल हळूहळू सवय' मला वाटलं. जराश्या निर्धास्तपणे मी कामाला सुरूवात केली. तोच पाळणाघरातून फोन "मिहिकाला १०२ ताप आहे. तुम्ही लगेच येऊन तिला घेउन जा." १०२ ताप आहे हे ऐकल्यावर मला काहीच सुचेना. मला ऑफीसमधून निघणं तर शक्यच नव्हतं. शिवाय तिच्या पाळणाघरात पोचेपर्यंत मला खूपच वेळ लागला असता. म्हणून मग मी आईला फोन करून तिला घेउन यायला सांगितलं. आईने तिला आणून औषध देऊन 'ताप उतरलाय' सांगेपर्यंत माझा जीव थार्‍यावर नव्हता. ऑफीसमधे वेड्यासारखं रडायलाच यायला लागलं. कशासाठी मी नोकरी करते? खरंच माझ्या पिल्लाला, माझ्या आईला त्रास देऊन काय मिळवते आहे मी? इतकं अपराधी वाटलं मला! त्याक्षणी सगळं सोडून घरी निघून जावसं वाटायला लागलं.नोकरी सोडणं मला कितीही वाटलं तरी प्रॅक्टीकली शक्य नाही हे समजत होतं. नक्की काय करावं? काय केलं म्हणजे सगळ्यांना कमीतकमी त्रास होईल? मिहिका मोठी होईपर्यंत हे असंच चालणार का? ती मोठी झाल्यावर तिला असं वाटेल का की आईने आपल्यापेक्षा स्वतःच्या करीअरकडे जास्त लक्ष दिलं? रात्रभर मी असाच उलटसुलट विचार करत होते.
गुरुवारी मतदानाची सुट्टी होती म्हणून बरं वाटत होतं. सहजच चॅनल बदलता बदलता झी मराठी वर सारेगमप चालू दिसलं. नाहीतरी त्या आठवड्याचे भाग मी बघितलेच नव्हते म्हणून बघत बसले. अमृता नातूने 'या चिमण्यांनो' सुरू केलं. मुळात ते गाणंच अतिशय सुंदर आहे. आणि अमृताने खरंच त्यादिवशी अगदी काळजातून सूर लावला होता. त्यावेळची माझी मनःस्थिती पण तशीच होती. अक्षरशः अंगावर काटा आला! पंडितजींनी तिचं कौतुक केलं तेव्हा तिला जे भरून आलं ना ती संवेदना माझ्या आतपर्यंत खोलवर पोचली. तिची मनाची उलघाल, तिला दोन पिल्लांना पाळणाघरात ठेवून तिथे येताना काय वाटलं असेल - जणू काही माझ्याच मनातल्या भावना कोणीतरी मला दृश्य स्वरूपात उलगडून दाखवतंय असं वाटत होतं.आणि पंडितजींनी इतकं सुंदर समजावलं तिला. त्या क्षणी ते मलाच समजावत आहेत असं मला वाटायला लागलं! त्यांच्या प्रत्येक वाक्यातून मला जणू माझ्या ओढाताणीचा अर्थ मला कळत होता. पंडितजी जेव्हा म्हणाले ना, "ही तुमची तप:श्चर्या आहे. तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका" तेव्हा अगदी मनापासून भरून आलं. अर्थात माझी नोकरी म्हणजे अगदी तप:श्चर्या वगैरे म्हणण्याइतकी नक्कीच नाही. पण त्यांच्या त्या शब्दांनी, त्या एका क्षणाने माझी उलघाल मात्र संपवली. अगदी
आता मला खरंच वाटतंय - सगळं सुरळीत होईल. थोडा वेळ लागेल पण सगळं नीट होईल. माझी लेकही जेव्हा मोठी होईल तेव्हा माझी ही सगळी धडपड समजून घेईल. तेवढे प्रगल्भ संस्कार मी नक्कीच करू शकेन असा आता विश्वास वाटतो!

(ही पोस्ट मी २७ एप्रिलला लिहिली होती)

रविवार, ऑक्टोबर २१, २००७

असंच आपलं उगीच!

आज कितीतरी दिवसांनी माझ्या ब्लॊगवर लिहायल बसले आहे....
खरंतर गेले कित्येक दिवस मी ब्लॊगवर लिहायचं असं ठरवते आहे. पण लिहायचा मूडच लागत नव्हता. कितीतरी वेळा मी अर्धवट पोस्ट लिहून नंतर डिलीट करून टाकलं. अगदी आतून लिहावसं वाटत नसताना उगाचच काहीतरी खरडण्यात काय अर्थ आहे? पण नंतर भीती वाटली की समजा अगदी कधीच वाटलं नाही लिहावसं तर मग माझा ब्लॊग मृत ब्लॊगांमध्ये जाईल का? म्हणून अगदी सरसावून पोस्ट लिहायला बसलीये खरी.
आता हे लिहिताना वाटतंय, समजा गेला मृत ब्लॊग मध्ये तर काय फरक पडणार आहे? नाहीतरी कोण इतकं चातकासारखी वाट बघतंय मी काय लिहितीये त्याची? हजारो लाखो ब्लॊग मधला एक बंद झाला तर कोणाला काय फरक पडणार आहे? मग मी कशासाठी हा लिहिण्याचा अट्टाहास करतीये?सगळे लिहितात म्हणून आपण पण काहीतरी खरडतोय ह्याला काय अर्थ आहे?
पण मग लक्षात आलं की कोणी सांगितलं म्हणून मी ब्लॊग कुठे सुरू केला होता? मला काय वाटतं ते लिहिण्यासाठीच तर मी हा ब्लॊग सुरू केलाय. मग मला जे काय वाटतंय, मग भले ते फालतू का असेना, मी ह्या ब्लॊगवर लिहू शकेन. मग त्यासाठी मला हा ब्लॊग जिवंत ठेवायलाच हवा.
आज अगदी अनायसे दसर्‍याच्या सुमुहुर्तावर पोस्ट लिहायचं मनात आलं आहे तर हे पोस्ट कितीही बोरींग असलं तरी टाकतीये. आणि आता नियमाने लिहायचं असं ठरवतीये. बघू या कितपत जमतंय!!!

शुक्रवार, जून २९, २००७

पाऊस!

पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!
आणि इथे आत नुसता आठवणींचा पाऊस
बाहेरच्या पावसापेक्षाही मुसळधार कोसळतोय!
तुझे नी माझे कितीतरी पाऊस सहज कवेत घेत....
तुला आठवतं आपण पहिल्यांदा एकत्र पावसात भिजलो होतो....
पावसापेक्षाही तुझ्या सहवासाने येणारा शहारा!
नंतर जसं काही व्यसनच लागलं पावसाचं....
दरवेळी नव्याने पाऊस अनुभवायचं....
आणि मग कितीवेळा त्या कोसळणार्‍या धारांमधे हरवून जायचो आपण...
स्वत:ला विसरून.....
आणि अचानक एके दिवशी पाऊस रुसला माझ्यावर...
आता इथे कायमचाच दुष्काळाचा मुक्काम आहे!
माझं भेगाळलेलं मन वाट पहातंय पावसाची
तू म्हणशील, की इतका आठवणींचा पाऊस आहे की.....
पण तुला माहीत आहे ना....
इतकं पाणी असलं सगळीकडे तरी
चातकाची तहान भागायला पावसाचेच थेंब हवेत ना?
हल्ली नुसतंच भरून येतं मनाचं आभाळ..
माझा पाऊस तर कधीच वाहून गेला डोळ्यांमधून.....
आता तुझा पाऊस पाठवशील?

मंगळवार, जून १२, २००७

पाऊस

सुटे वारा असा बेभान आणि पिसाटते मन
धुंद बरसत येतो असा पाऊस पाऊस

त्याच्या तालात रंगून विश्व गेले मोहरून
कधी भुरूभुरू झरतो असा पाऊस पाऊस

मनी आठवांची दाटी डोळे गेले पाणावून
आणि झिम्मड झडतो असा पाऊस पाऊस

सप्तरंगांनी खुलते इंद्रधनूची कमान
नभ धरेस जोडतो असा पाऊस पाऊस

कधी पावसाची धून कधी श्रावणाचे ऊन
आणि सोनेरी सजतो असा पाऊस पाऊस

गुरुवार, एप्रिल १९, २००७

लाल है रंग प्यार का.....

आज मिटींग चालू असताना मधेच नजर बाहेर गेली. आह! गुलमोहराच्या झाडावर एकच फांदी सुरेख केशरी सजलेली दिसली. तजेलदार हिरव्या-पोपटी पानांमधे ती फांदी इतकी सुंदर दिसत होती!!!
शिशिराची पानगळ संपून आता सगळ्या झाडांवर सुंदर कोवळी पालवी दिसू लागली आहे. वसंतऋतूसोबत सगळ्याच सृष्टीवर प्रेमाचा लाल-केशरी रंग चढतो आहे!!
परवा ल मेरीडियन हॊटेलच्या जवळून जात असताना भलंमोठं पिंपळाचं झाड दिसलं ( हा एक वृक्ष आता पुण्यातू हळूहळू हद्दपार व्हायला लागला आहे. त्याच्या पानांचा अलंकारीक आकार आणि वहीत ठेवल्यावर पडणारी सुरेख जाळी आपल्या पुढच्या पिढीला माहित असेल काय?). त्याला नुकतीच पालवी फुटली होती. नवीन छोटी छोटी पानं तांब्याचा हलकाच थर दिल्यासारखी इतकी मस्त दिसत होती!
पळस, पांगारा तर केव्हाचेच लाल रंगात न्हाऊन निघाले आहेत. झाडावर एकही पान नाही. नुसती लालचुटूक फुलं. निळंभोर निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही फुलं इतकी देखणी दिसताहेत!
आता हळूहळू ऊन चढेल तसा आंबाही ह्या प्रेमाच्या रंगात रंगून जाईल. आपल्या पिवळ्या रंगावर सुरेख केशरी झाक लेऊन सजून बसेल.
तांबडा चाफाही फुलला आहेच! गुलमोहरही पूर्ण फुलून येईल. पळस-पांगार्‍याशी स्पर्धा करत आपला केशरी-लाल रंग मिरवेल. जमिनीवरही उन्हात सजून दिसणारे केशरी गालीचे अंथरेल.
आणि मग एखाद्या दिवशी सगळंच बदलेल. मुसळधार पावसाने सगळा फुलोरा जमिनीवर येईल आणि मग हिरव्या रंगाचा सृजनोत्सव सुरू होईल. तोपर्यंत आपणही ह्या प्रेमाच्या रंगात बुडून जायला काय हरकत आहे!!!

राही बदल गये!

काल फार दिवसांनी शाळेच्या ग्रुपमधली मैत्रीण भेटली. तुझी नोकरी कशी चललीये, आता कुठे असतेस, ही काय करते, ती काय करते अश्या जुजबी गप्पा झाल्या. फोन नंबर, मेल आयडी ची देवाण घेवाण झाली. आणि अचानक आम्ही गप्पच झालो. मग बळबळंच संभाषण ताणण्याचाही प्रयत्न झाला. पण बात कुछ जमी नही! मग काय, दोघीही आपापल्या वाटेने निघालो. मनात आलं, किती बदल झाला आपल्या दोघींच्यात!! शाळेत असताना दिवस दिवस गप्पांमध्ये सहज घालवायचो आणि आज काय बोलायचं असा प्रश्न पडलाय.
अगदी बालवाडीपसून ते इंजिनीयरींग पूर्ण होईपर्यंत किती तरी मित्र-मैत्रिणी झाले. त्यातल्या किती जणांशी अजूनही संपर्क आहे? लक्षात आळं की यादी खूपच लहान आहे संपर्क नसलेल्यांच्या यादीपेक्षा......
अगदी बालवाडीचं आता आठवत नाही. पण पहिलीत गेल्या गेल्या पहिल्या दिवशी माझी ओळख माझी अजूनही खास मैत्रीण असलेल्या भूपालीशी झाली होती. ती मैत्री आजही तितकीच घट्टपणे टिकून आहे. आणि आजही आमच्या दोघींच्या आयुष्यात एकही गोष्ट अशी नाही की जी एकमेकींना माहीत नाही.
सातवीला अमच्या दोघींच्या तुकड्या बदलल्या. आणि माझं सेमी इंग्लिश माध्यम झालं. त्यामुळे वर्गात, क्लासला एकत्र असणार्‍या मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला. मग अकरावी - बारावीत कॊलेज, क्लासमधे असलेल्या मैत्रिणींचा अजून एक, डिप्लोमाला गेल्यानंतर तिथल्या मित्र-मैत्रिणींचा अजून एक ग्रुप, मग इंजिनीयरींगच्या कॊलेजमधला एक ग्रुप, मग ऒफीसमधला ग्रुप.. कितीतरी मित्र-मैत्रीणी होते. आणि त्या-त्यावेळी ह्या प्रत्येक ग्रुपमधले लोक खूप जवळचे वाटायचे. कितीतेरी secrets आम्ही त्या वेळी share केली होती. पण आता विचार केला तर मी त्यातल्या फक्त डिप्लोमाच्या ग्रुपशी छान संपर्क ठेवून आहे. बाकी काही जणांशी कारणाने तर काही जणांशी मुळीच नाही.
असं का झालं असेल? प्रत्येकाच्याच आयुष्यात असं होत असेल का? कदाचित असं असेल की त्या त्या वेळी आपण कायम ज्या लोकांबरोबर असतो, त्या त्या लोकांशी सहवासाने घट्ट मैत्री झाल्यासारखी वाटते. प्रत्यक्षात ते फक्त सहवासाचंच वेगळं रूप असतं. आणि जसा आपला सहवास कमी होईल तसं ते नातं विरतही जातं. कदाचित आपले सूर ज्या व्यक्तीशी जुळतात, त्यांच्याशीच दीर्घकाळ मैत्री टिकते. अश्या मित्र-मैत्रिणींना आपण किती वर्षांनी भेटतो आहोत यामुळे बहुधा काहीच फरक पडत नाही. ते नातं इतकं दृढ असतं की सहवासाचं बंधन उरत नाही. खरं- मनापासून उमललेलं नातं!
आपलं आयुष्य जसं जसं पुढे जाईल, तसे अनेक नवीन लोक भेटतील . कोणाशी सूर जुळतील, कोणाची साथ-संगत तेवढ्यापुरतीच असेल. आताचे काही लोक तेव्हा सोबत असतील किंवा नसतीलही. अजून खूप वर्षांनी परत मी हेच म्हणेन.
मंजील वही है - दोस्ती
राही बदल गये!

सोमवार, एप्रिल ०९, २००७

कर्तृत्त्ववती

आजी! आपल्या सगळ्यांचा किती जिव्हाळ्याचा विषय असतो नाही? आजीची मायाच अशी असते, दुधावरच्या सायीला जिवापाड जपणारी! माझा आणि आजीचा (बाबांची आई) सहवास उणापुरा ९ वर्षांचा. पण त्यातही आजीकडुन जे बाळकडू मिळालं ते मला जन्मभर पुरेल. ती गेली तेव्हा फारसं काहीच मला कळत नव्हतं. पण आज जेव्हा मी विचार करते, तेव्हा तिच्या व्यक्तीमत्त्वाचे कितीतरी सुरेख पैलू मझ्या लक्षात येतात. आजी म्हटलं की सर्वात आधी मला आठवतं ते तिचं करारी व्यक्तिमत्त्व. भरपूर ऊंची, सणसणीत बांधा, आणि एकूणच देहबोलीतून जाणवणारा निग्रहीपणा. तिच्याकडे बघितलं की वादळवार्‍याचा सामना करून पुन्हा ताठपणे उभ्या राहणार्‍या वटवृक्षाची आठवण व्हावी. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी असणारी माझी आजी. बुद्धीने अतिशय तल्लख. त्याकाळात उत्तम गुण मिळवून फायनलची परीक्षा उतीर्ण झाली होती. पाठच्या तीन बहिणी. तेव्हा कोणीतरी माझ्या पणजीला सांगितलेलं की तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न करा म्हणजे तुम्हाला मुलगा होईल. त्यामुळे फायनल झाल्या झाल्या पंधराव्या वर्षीच तिचं लग्न झालं. खरोखरच तिच्या लग्नानंतर तिला भाऊ झाला. माझे बाबा आणि त्यांचे मामा दोघेही एकाच वयाचे. आता मी विचार करते तेव्हा मला ही गोष्ट खूप मजेशीर वाटते. पण बहुधा त्यावेळच्या काळत ही सामान्य बाब असावी. सासरी देखील माझी आजी सर्वात मोठी सून असल्याने तिच्यावर मोठी जबाबदारी होती. सततचे पाहुणे, धाकटे दीर, नणंदा, त्यांची लग्न, बाळंतपणं सारं काही तिने केलं. सगळं तसं सुरळीत चाललेलं असताना अचानकच तिच्यावर फार मोठा आघात झाला. आजीचं वय अवघं बावीस वर्षाचं असताना माझे आजोबा गेले. तेव्हा माझे बाबा फक्त पाच वर्षांचे, आत्या अडीच वर्षाची आणि आजीला सातवा महिना. सार्‍या घरावर अक्षरशः आभाळ कोसळलं. ती माझी दुसरी आत्या आठ महिन्यांची होऊन गेली. "धाकटी लेक गेली तर दुःख करत बसायलाही मला सवड नव्हती. ती गेली तर निदान मी ह्या दोन मुलांसाठी तरी कमवून आणायला मोकळी झाले." आजीचे हे उद्गार आज आठवले, की त्यामगची तिची अगतिकता जाणवून डोळे पाणावतात.
घरच्या लोकांचा प्रचंड विरोध पत्करून आजीने नोकरी शोधायला सुरुवात केली. त्याकाळी (१९५५) फायनल पास झालेल्या सरकारी नोकरी मिळणं तसं काहीच अवघड नव्हतं. परंतु घरच्या लोकांनी पूर्णच असहकाराचं धोरण स्वीकारलं होतं. घरात येणारी नोकरी संदर्भातली पत्र आजीपर्यंत पोचूच देत नसत. शेवटी आजीने पत्रव्यवहारासाठी वेगळा पत्ता दिला. आणि त्यानंतर आलेली पहिली संधी - ग्रामसेविकेची नोकरी पत्करली. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना पुण्यातच ठेवण्याचा निर्णय घेतला. ग्रामसेविकेच्या नोकरीत भरपूर फिरावं लागत असे. दररोज मैलोनमैल चालावं लागे. तशीच काही अडचण असली तर रात्री बेरात्री सुद्धा कुठे कुठे जावं लागे. तरूण वय, त्यातही नवरा नसताना खेड्यापड्यात राहून हे सगळं करणं अतिशय कठीण काम होतं. पण आजीने हिमतीने सगळं केलं. अजूनही दुर्गाम आणि मगास असलेल्या जव्हार-मोखाड्यासारख्या आदिवासी भागात तिने साठच्या दशकात नोकरी केलेली आहे. ’तुला भीती नाही का वाटायची?’ असं विचारलं तर म्हणायची, ’कसली आलीये भीती? भूत - बित आलं तर तेच मला घाबरून जाईल. आणि बाळा, तेव्हा नोकरी टिकवणं हे एकमेव ध्येय होतं. त्यामुळे भीती वगैरे गोष्टींना काही थाराच नव्ह्ता.’ ही नोकरी तिने बाबांना नोकरी लागून आत्याचं लग्न होईपर्यंत केली. पुढे आई-बाबांचं लग्न झाल्यावर बाबांना Air Force quarters मिळाले आणि मग बाबांना इतक्या वर्षांनी आईजवळ रहायला मिळालं. तेव्हा आजी अगदी टिपिकल सासू होती. आई बाबा एकत्र सिनेमाला वगैरे गेलेले तिला आवडत नसे. आईला कानात रिंगा घालायलाही तिने परवनगी दिली नाही. पण आई आणि बाबांनी नेहेमीच तिला समजून घेतलं. आयुष्यभर कोणतीच हौस मौज करायला न मिळाल्यामुळे तिचा स्वभाव असा कडवट झाला असेल काय? नंतर आजीदेखिल खूपच निवळली. आणि आईशिवाय तर तिचं मुळीच पान हलत नसे. आजीचा स्वभाव सतत माणसं जोडत रहाणारा होता. घरातले सगळे लोक, नातेवाईक, इतकंच काय पण बाबांच्या सगळ्या मित्रांनाही माझ्या आजीचा खूप आधार वाटत असे. खचून गेलेल्या माणसाला नुसत्या योग्य शब्दांनी उभारी कशी देता येते हे मी आजीकडून शिकले. जे काही काम कराल ते उत्तमच केलं पाहिजे अस आमच्या आजीचा कटाक्ष असे. तिचं प्रत्येकच काम इतकं देखणं असे की नजर ठरत नसे.शिस्त हाही एक अतिशय महत्त्वाचा विषय. आजीची इतकी कडक शिस्त होती घरामधे! तेव्हा तिच्या काही काही गोष्टींचा राग यायचा, पण आता कळतं की लहानपणी तिने लावलेल्या छोट्या छोट्या सवयी आज किती उपयोगी पडतात. आपल्या घासतला घास दुसर्‍या गरजू माणसाला दिला पाहिजे हे ही तिने सतत आमच्या मनावरती ठसवलं. आजीची एक मजेशीर सवय म्हणजे दर एक-दोन वाक्यांनी तिच्या बोलण्यात एक म्हण असायची. खेडेगावात राहिल्यामुळे तर तिच्या ह्या म्हणींच्या संग्रहात खूपच भर पडलेली होती. आम्ही अगदी फारच त्रास द्यायला लागलो की ती आम्हाला ’अगं बाई, घटकाभर सुभद्राबाई काळे ( हे तिच्या आईचं नाव) हो’ असं म्हणत असे. ते ऐकायला तेव्हा खूप मजा वाटायची. आजही तिच्या तोंडून ऐकलेल्या काही म्हणी सहज बोलण्यात वपरल्या जातात. आणि बरोबरीचे लोक ही कुठेली म्हण काढलीस असं म्हणतात, तेव्हा तिने कळत नकळत आमच्या शब्दभांडारात केवढी भर घातली आहे हे जाणवतं.
दूरदॄष्टी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता हेही आजीचे घेण्यासारखे गुण होते. माझ्या आतेभावाला commerce मधे फारसं करियर करता येणार नाही, हे कळल्यावर तिने स्वतः निर्णय घेऊन त्याला योग्य वेळी ITI घातलं. माणसाचा कल ओळखून त्याप्रमाणे त्याला उत्तेजन द्यायचं हे आजीचं वैशिष्ट्यच होतं. आयुष्यात इतकं काही भोगूनही आजीनी स्वतःचं दुःख कधीही उगाळलं नाही. तिच्या आयुष्याकडून अपेक्षादेखिल खूप साध्या होत्या. पण स्वत:च घर हा तिचा अगदी वीक पॊईंट होता. आजीला ’जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणं अजिबात आवडत नसे. "असं म्हणावं अशी वेळ अजूनतरी माझ्या अयुष्यात आली नाही. जेव्हा स्वतःचं घर होईल तेचा मी हे गाणं रेकॊर्ड करून घेईन आणि मग सतत तेच ऐकत बसेन. एकदा का आपलं स्वतःचं घर झालं, की राजीव गांधी एका बाजूला आणि मी एका बाजूला" (म्हणजे पंतप्रधानांइतकी सुखी) असं ती म्हणत असे. तिचं हे स्वप्न मात्र ती असताना पूर्ण झालं नाही. वयाच्या अवघ्या ५८व्या वर्षीच आपलं स्वप्न अर्धवटच ठेवून ती गेली. मी चौथीत असताना शिष्यवृत्तीच्या परिक्षेला बसले होते. तेव्हा सगळे प्रश्न उतरवून घ्यायचे आणि मग त्यापुढे उत्तरं लिहायची असं आम्हाला शाळेत सांगितलं होतं. मला लिखाणाचा फार कंटाला यायच. तेव्हा आजी दररोज मला सगळे प्रश्न dictate करत असे. आणि मग मि ते सोडवत असे. तिने पूर्ण वर्षभर माझा असा अभ्यास करून घेतला. परंतु दुर्दैवाने मला शिष्यवृत्ती मिळली तेव्हा आजी या जगात नव्हती. त्यादिवशी निकाल कळल्या-कळल्या धो धो रडल्याचं मला आजही आठवतं. आज चतुर्थी. आजीला जाऊन आज बरोबर १७ वर्ष झाली. या सतरा वर्षात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. कधीही अगदी खचून गेल्यासारखं झालं की आजीची शिकवण आठवते आणि आपोआपच सगळं frustration कुठच्या कुठे पळून जातं. सगळ्या संकटांचा हिमतीने सामना करणारी कतृत्त्ववान आजी नेहेमीच माझा आदर्श आहे.