काल फार दिवसांनी शाळेच्या ग्रुपमधली मैत्रीण भेटली. तुझी नोकरी कशी चललीये, आता कुठे असतेस, ही काय करते, ती काय करते अश्या जुजबी गप्पा झाल्या. फोन नंबर, मेल आयडी ची देवाण घेवाण झाली. आणि अचानक आम्ही गप्पच झालो. मग बळबळंच संभाषण ताणण्याचाही प्रयत्न झाला. पण बात कुछ जमी नही! मग काय, दोघीही आपापल्या वाटेने निघालो. मनात आलं, किती बदल झाला आपल्या दोघींच्यात!! शाळेत असताना दिवस दिवस गप्पांमध्ये सहज घालवायचो आणि आज काय बोलायचं असा प्रश्न पडलाय.
अगदी बालवाडीपसून ते इंजिनीयरींग पूर्ण होईपर्यंत किती तरी मित्र-मैत्रिणी झाले. त्यातल्या किती जणांशी अजूनही संपर्क आहे? लक्षात आळं की यादी खूपच लहान आहे संपर्क नसलेल्यांच्या यादीपेक्षा......
अगदी बालवाडीचं आता आठवत नाही. पण पहिलीत गेल्या गेल्या पहिल्या दिवशी माझी ओळख माझी अजूनही खास मैत्रीण असलेल्या भूपालीशी झाली होती. ती मैत्री आजही तितकीच घट्टपणे टिकून आहे. आणि आजही आमच्या दोघींच्या आयुष्यात एकही गोष्ट अशी नाही की जी एकमेकींना माहीत नाही.
सातवीला अमच्या दोघींच्या तुकड्या बदलल्या. आणि माझं सेमी इंग्लिश माध्यम झालं. त्यामुळे वर्गात, क्लासला एकत्र असणार्या मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला. मग अकरावी - बारावीत कॊलेज, क्लासमधे असलेल्या मैत्रिणींचा अजून एक, डिप्लोमाला गेल्यानंतर तिथल्या मित्र-मैत्रिणींचा अजून एक ग्रुप, मग इंजिनीयरींगच्या कॊलेजमधला एक ग्रुप, मग ऒफीसमधला ग्रुप.. कितीतरी मित्र-मैत्रीणी होते. आणि त्या-त्यावेळी ह्या प्रत्येक ग्रुपमधले लोक खूप जवळचे वाटायचे. कितीतेरी secrets आम्ही त्या वेळी share केली होती. पण आता विचार केला तर मी त्यातल्या फक्त डिप्लोमाच्या ग्रुपशी छान संपर्क ठेवून आहे. बाकी काही जणांशी कारणाने तर काही जणांशी मुळीच नाही.
असं का झालं असेल? प्रत्येकाच्याच आयुष्यात असं होत असेल का? कदाचित असं असेल की त्या त्या वेळी आपण कायम ज्या लोकांबरोबर असतो, त्या त्या लोकांशी सहवासाने घट्ट मैत्री झाल्यासारखी वाटते. प्रत्यक्षात ते फक्त सहवासाचंच वेगळं रूप असतं. आणि जसा आपला सहवास कमी होईल तसं ते नातं विरतही जातं. कदाचित आपले सूर ज्या व्यक्तीशी जुळतात, त्यांच्याशीच दीर्घकाळ मैत्री टिकते. अश्या मित्र-मैत्रिणींना आपण किती वर्षांनी भेटतो आहोत यामुळे बहुधा काहीच फरक पडत नाही. ते नातं इतकं दृढ असतं की सहवासाचं बंधन उरत नाही. खरं- मनापासून उमललेलं नातं!
आपलं आयुष्य जसं जसं पुढे जाईल, तसे अनेक नवीन लोक भेटतील . कोणाशी सूर जुळतील, कोणाची साथ-संगत तेवढ्यापुरतीच असेल. आताचे काही लोक तेव्हा सोबत असतील किंवा नसतीलही. अजून खूप वर्षांनी परत मी हेच म्हणेन.
मंजील वही है - दोस्ती
राही बदल गये!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 टिप्पणी:
You are right .....
टिप्पणी पोस्ट करा