आज मिटींग चालू असताना मधेच नजर बाहेर गेली. आह! गुलमोहराच्या झाडावर एकच फांदी सुरेख केशरी सजलेली दिसली. तजेलदार हिरव्या-पोपटी पानांमधे ती फांदी इतकी सुंदर दिसत होती!!!
शिशिराची पानगळ संपून आता सगळ्या झाडांवर सुंदर कोवळी पालवी दिसू लागली आहे. वसंतऋतूसोबत सगळ्याच सृष्टीवर प्रेमाचा लाल-केशरी रंग चढतो आहे!!
परवा ल मेरीडियन हॊटेलच्या जवळून जात असताना भलंमोठं पिंपळाचं झाड दिसलं ( हा एक वृक्ष आता पुण्यातू हळूहळू हद्दपार व्हायला लागला आहे. त्याच्या पानांचा अलंकारीक आकार आणि वहीत ठेवल्यावर पडणारी सुरेख जाळी आपल्या पुढच्या पिढीला माहित असेल काय?). त्याला नुकतीच पालवी फुटली होती. नवीन छोटी छोटी पानं तांब्याचा हलकाच थर दिल्यासारखी इतकी मस्त दिसत होती!
पळस, पांगारा तर केव्हाचेच लाल रंगात न्हाऊन निघाले आहेत. झाडावर एकही पान नाही. नुसती लालचुटूक फुलं. निळंभोर निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही फुलं इतकी देखणी दिसताहेत!
आता हळूहळू ऊन चढेल तसा आंबाही ह्या प्रेमाच्या रंगात रंगून जाईल. आपल्या पिवळ्या रंगावर सुरेख केशरी झाक लेऊन सजून बसेल.
तांबडा चाफाही फुलला आहेच! गुलमोहरही पूर्ण फुलून येईल. पळस-पांगार्याशी स्पर्धा करत आपला केशरी-लाल रंग मिरवेल. जमिनीवरही उन्हात सजून दिसणारे केशरी गालीचे अंथरेल.
आणि मग एखाद्या दिवशी सगळंच बदलेल. मुसळधार पावसाने सगळा फुलोरा जमिनीवर येईल आणि मग हिरव्या रंगाचा सृजनोत्सव सुरू होईल. तोपर्यंत आपणही ह्या प्रेमाच्या रंगात बुडून जायला काय हरकत आहे!!!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 टिप्पणी:
वा
टिप्पणी पोस्ट करा