गुरुवार, एप्रिल १९, २००७

लाल है रंग प्यार का.....

आज मिटींग चालू असताना मधेच नजर बाहेर गेली. आह! गुलमोहराच्या झाडावर एकच फांदी सुरेख केशरी सजलेली दिसली. तजेलदार हिरव्या-पोपटी पानांमधे ती फांदी इतकी सुंदर दिसत होती!!!
शिशिराची पानगळ संपून आता सगळ्या झाडांवर सुंदर कोवळी पालवी दिसू लागली आहे. वसंतऋतूसोबत सगळ्याच सृष्टीवर प्रेमाचा लाल-केशरी रंग चढतो आहे!!
परवा ल मेरीडियन हॊटेलच्या जवळून जात असताना भलंमोठं पिंपळाचं झाड दिसलं ( हा एक वृक्ष आता पुण्यातू हळूहळू हद्दपार व्हायला लागला आहे. त्याच्या पानांचा अलंकारीक आकार आणि वहीत ठेवल्यावर पडणारी सुरेख जाळी आपल्या पुढच्या पिढीला माहित असेल काय?). त्याला नुकतीच पालवी फुटली होती. नवीन छोटी छोटी पानं तांब्याचा हलकाच थर दिल्यासारखी इतकी मस्त दिसत होती!
पळस, पांगारा तर केव्हाचेच लाल रंगात न्हाऊन निघाले आहेत. झाडावर एकही पान नाही. नुसती लालचुटूक फुलं. निळंभोर निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही फुलं इतकी देखणी दिसताहेत!
आता हळूहळू ऊन चढेल तसा आंबाही ह्या प्रेमाच्या रंगात रंगून जाईल. आपल्या पिवळ्या रंगावर सुरेख केशरी झाक लेऊन सजून बसेल.
तांबडा चाफाही फुलला आहेच! गुलमोहरही पूर्ण फुलून येईल. पळस-पांगार्‍याशी स्पर्धा करत आपला केशरी-लाल रंग मिरवेल. जमिनीवरही उन्हात सजून दिसणारे केशरी गालीचे अंथरेल.
आणि मग एखाद्या दिवशी सगळंच बदलेल. मुसळधार पावसाने सगळा फुलोरा जमिनीवर येईल आणि मग हिरव्या रंगाचा सृजनोत्सव सुरू होईल. तोपर्यंत आपणही ह्या प्रेमाच्या रंगात बुडून जायला काय हरकत आहे!!!

राही बदल गये!

काल फार दिवसांनी शाळेच्या ग्रुपमधली मैत्रीण भेटली. तुझी नोकरी कशी चललीये, आता कुठे असतेस, ही काय करते, ती काय करते अश्या जुजबी गप्पा झाल्या. फोन नंबर, मेल आयडी ची देवाण घेवाण झाली. आणि अचानक आम्ही गप्पच झालो. मग बळबळंच संभाषण ताणण्याचाही प्रयत्न झाला. पण बात कुछ जमी नही! मग काय, दोघीही आपापल्या वाटेने निघालो. मनात आलं, किती बदल झाला आपल्या दोघींच्यात!! शाळेत असताना दिवस दिवस गप्पांमध्ये सहज घालवायचो आणि आज काय बोलायचं असा प्रश्न पडलाय.
अगदी बालवाडीपसून ते इंजिनीयरींग पूर्ण होईपर्यंत किती तरी मित्र-मैत्रिणी झाले. त्यातल्या किती जणांशी अजूनही संपर्क आहे? लक्षात आळं की यादी खूपच लहान आहे संपर्क नसलेल्यांच्या यादीपेक्षा......
अगदी बालवाडीचं आता आठवत नाही. पण पहिलीत गेल्या गेल्या पहिल्या दिवशी माझी ओळख माझी अजूनही खास मैत्रीण असलेल्या भूपालीशी झाली होती. ती मैत्री आजही तितकीच घट्टपणे टिकून आहे. आणि आजही आमच्या दोघींच्या आयुष्यात एकही गोष्ट अशी नाही की जी एकमेकींना माहीत नाही.
सातवीला अमच्या दोघींच्या तुकड्या बदलल्या. आणि माझं सेमी इंग्लिश माध्यम झालं. त्यामुळे वर्गात, क्लासला एकत्र असणार्‍या मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला. मग अकरावी - बारावीत कॊलेज, क्लासमधे असलेल्या मैत्रिणींचा अजून एक, डिप्लोमाला गेल्यानंतर तिथल्या मित्र-मैत्रिणींचा अजून एक ग्रुप, मग इंजिनीयरींगच्या कॊलेजमधला एक ग्रुप, मग ऒफीसमधला ग्रुप.. कितीतरी मित्र-मैत्रीणी होते. आणि त्या-त्यावेळी ह्या प्रत्येक ग्रुपमधले लोक खूप जवळचे वाटायचे. कितीतेरी secrets आम्ही त्या वेळी share केली होती. पण आता विचार केला तर मी त्यातल्या फक्त डिप्लोमाच्या ग्रुपशी छान संपर्क ठेवून आहे. बाकी काही जणांशी कारणाने तर काही जणांशी मुळीच नाही.
असं का झालं असेल? प्रत्येकाच्याच आयुष्यात असं होत असेल का? कदाचित असं असेल की त्या त्या वेळी आपण कायम ज्या लोकांबरोबर असतो, त्या त्या लोकांशी सहवासाने घट्ट मैत्री झाल्यासारखी वाटते. प्रत्यक्षात ते फक्त सहवासाचंच वेगळं रूप असतं. आणि जसा आपला सहवास कमी होईल तसं ते नातं विरतही जातं. कदाचित आपले सूर ज्या व्यक्तीशी जुळतात, त्यांच्याशीच दीर्घकाळ मैत्री टिकते. अश्या मित्र-मैत्रिणींना आपण किती वर्षांनी भेटतो आहोत यामुळे बहुधा काहीच फरक पडत नाही. ते नातं इतकं दृढ असतं की सहवासाचं बंधन उरत नाही. खरं- मनापासून उमललेलं नातं!
आपलं आयुष्य जसं जसं पुढे जाईल, तसे अनेक नवीन लोक भेटतील . कोणाशी सूर जुळतील, कोणाची साथ-संगत तेवढ्यापुरतीच असेल. आताचे काही लोक तेव्हा सोबत असतील किंवा नसतीलही. अजून खूप वर्षांनी परत मी हेच म्हणेन.
मंजील वही है - दोस्ती
राही बदल गये!

सोमवार, एप्रिल ०९, २००७

कर्तृत्त्ववती

आजी! आपल्या सगळ्यांचा किती जिव्हाळ्याचा विषय असतो नाही? आजीची मायाच अशी असते, दुधावरच्या सायीला जिवापाड जपणारी! माझा आणि आजीचा (बाबांची आई) सहवास उणापुरा ९ वर्षांचा. पण त्यातही आजीकडुन जे बाळकडू मिळालं ते मला जन्मभर पुरेल. ती गेली तेव्हा फारसं काहीच मला कळत नव्हतं. पण आज जेव्हा मी विचार करते, तेव्हा तिच्या व्यक्तीमत्त्वाचे कितीतरी सुरेख पैलू मझ्या लक्षात येतात. आजी म्हटलं की सर्वात आधी मला आठवतं ते तिचं करारी व्यक्तिमत्त्व. भरपूर ऊंची, सणसणीत बांधा, आणि एकूणच देहबोलीतून जाणवणारा निग्रहीपणा. तिच्याकडे बघितलं की वादळवार्‍याचा सामना करून पुन्हा ताठपणे उभ्या राहणार्‍या वटवृक्षाची आठवण व्हावी. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी असणारी माझी आजी. बुद्धीने अतिशय तल्लख. त्याकाळात उत्तम गुण मिळवून फायनलची परीक्षा उतीर्ण झाली होती. पाठच्या तीन बहिणी. तेव्हा कोणीतरी माझ्या पणजीला सांगितलेलं की तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न करा म्हणजे तुम्हाला मुलगा होईल. त्यामुळे फायनल झाल्या झाल्या पंधराव्या वर्षीच तिचं लग्न झालं. खरोखरच तिच्या लग्नानंतर तिला भाऊ झाला. माझे बाबा आणि त्यांचे मामा दोघेही एकाच वयाचे. आता मी विचार करते तेव्हा मला ही गोष्ट खूप मजेशीर वाटते. पण बहुधा त्यावेळच्या काळत ही सामान्य बाब असावी. सासरी देखील माझी आजी सर्वात मोठी सून असल्याने तिच्यावर मोठी जबाबदारी होती. सततचे पाहुणे, धाकटे दीर, नणंदा, त्यांची लग्न, बाळंतपणं सारं काही तिने केलं. सगळं तसं सुरळीत चाललेलं असताना अचानकच तिच्यावर फार मोठा आघात झाला. आजीचं वय अवघं बावीस वर्षाचं असताना माझे आजोबा गेले. तेव्हा माझे बाबा फक्त पाच वर्षांचे, आत्या अडीच वर्षाची आणि आजीला सातवा महिना. सार्‍या घरावर अक्षरशः आभाळ कोसळलं. ती माझी दुसरी आत्या आठ महिन्यांची होऊन गेली. "धाकटी लेक गेली तर दुःख करत बसायलाही मला सवड नव्हती. ती गेली तर निदान मी ह्या दोन मुलांसाठी तरी कमवून आणायला मोकळी झाले." आजीचे हे उद्गार आज आठवले, की त्यामगची तिची अगतिकता जाणवून डोळे पाणावतात.
घरच्या लोकांचा प्रचंड विरोध पत्करून आजीने नोकरी शोधायला सुरुवात केली. त्याकाळी (१९५५) फायनल पास झालेल्या सरकारी नोकरी मिळणं तसं काहीच अवघड नव्हतं. परंतु घरच्या लोकांनी पूर्णच असहकाराचं धोरण स्वीकारलं होतं. घरात येणारी नोकरी संदर्भातली पत्र आजीपर्यंत पोचूच देत नसत. शेवटी आजीने पत्रव्यवहारासाठी वेगळा पत्ता दिला. आणि त्यानंतर आलेली पहिली संधी - ग्रामसेविकेची नोकरी पत्करली. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना पुण्यातच ठेवण्याचा निर्णय घेतला. ग्रामसेविकेच्या नोकरीत भरपूर फिरावं लागत असे. दररोज मैलोनमैल चालावं लागे. तशीच काही अडचण असली तर रात्री बेरात्री सुद्धा कुठे कुठे जावं लागे. तरूण वय, त्यातही नवरा नसताना खेड्यापड्यात राहून हे सगळं करणं अतिशय कठीण काम होतं. पण आजीने हिमतीने सगळं केलं. अजूनही दुर्गाम आणि मगास असलेल्या जव्हार-मोखाड्यासारख्या आदिवासी भागात तिने साठच्या दशकात नोकरी केलेली आहे. ’तुला भीती नाही का वाटायची?’ असं विचारलं तर म्हणायची, ’कसली आलीये भीती? भूत - बित आलं तर तेच मला घाबरून जाईल. आणि बाळा, तेव्हा नोकरी टिकवणं हे एकमेव ध्येय होतं. त्यामुळे भीती वगैरे गोष्टींना काही थाराच नव्ह्ता.’ ही नोकरी तिने बाबांना नोकरी लागून आत्याचं लग्न होईपर्यंत केली. पुढे आई-बाबांचं लग्न झाल्यावर बाबांना Air Force quarters मिळाले आणि मग बाबांना इतक्या वर्षांनी आईजवळ रहायला मिळालं. तेव्हा आजी अगदी टिपिकल सासू होती. आई बाबा एकत्र सिनेमाला वगैरे गेलेले तिला आवडत नसे. आईला कानात रिंगा घालायलाही तिने परवनगी दिली नाही. पण आई आणि बाबांनी नेहेमीच तिला समजून घेतलं. आयुष्यभर कोणतीच हौस मौज करायला न मिळाल्यामुळे तिचा स्वभाव असा कडवट झाला असेल काय? नंतर आजीदेखिल खूपच निवळली. आणि आईशिवाय तर तिचं मुळीच पान हलत नसे. आजीचा स्वभाव सतत माणसं जोडत रहाणारा होता. घरातले सगळे लोक, नातेवाईक, इतकंच काय पण बाबांच्या सगळ्या मित्रांनाही माझ्या आजीचा खूप आधार वाटत असे. खचून गेलेल्या माणसाला नुसत्या योग्य शब्दांनी उभारी कशी देता येते हे मी आजीकडून शिकले. जे काही काम कराल ते उत्तमच केलं पाहिजे अस आमच्या आजीचा कटाक्ष असे. तिचं प्रत्येकच काम इतकं देखणं असे की नजर ठरत नसे.शिस्त हाही एक अतिशय महत्त्वाचा विषय. आजीची इतकी कडक शिस्त होती घरामधे! तेव्हा तिच्या काही काही गोष्टींचा राग यायचा, पण आता कळतं की लहानपणी तिने लावलेल्या छोट्या छोट्या सवयी आज किती उपयोगी पडतात. आपल्या घासतला घास दुसर्‍या गरजू माणसाला दिला पाहिजे हे ही तिने सतत आमच्या मनावरती ठसवलं. आजीची एक मजेशीर सवय म्हणजे दर एक-दोन वाक्यांनी तिच्या बोलण्यात एक म्हण असायची. खेडेगावात राहिल्यामुळे तर तिच्या ह्या म्हणींच्या संग्रहात खूपच भर पडलेली होती. आम्ही अगदी फारच त्रास द्यायला लागलो की ती आम्हाला ’अगं बाई, घटकाभर सुभद्राबाई काळे ( हे तिच्या आईचं नाव) हो’ असं म्हणत असे. ते ऐकायला तेव्हा खूप मजा वाटायची. आजही तिच्या तोंडून ऐकलेल्या काही म्हणी सहज बोलण्यात वपरल्या जातात. आणि बरोबरीचे लोक ही कुठेली म्हण काढलीस असं म्हणतात, तेव्हा तिने कळत नकळत आमच्या शब्दभांडारात केवढी भर घातली आहे हे जाणवतं.
दूरदॄष्टी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता हेही आजीचे घेण्यासारखे गुण होते. माझ्या आतेभावाला commerce मधे फारसं करियर करता येणार नाही, हे कळल्यावर तिने स्वतः निर्णय घेऊन त्याला योग्य वेळी ITI घातलं. माणसाचा कल ओळखून त्याप्रमाणे त्याला उत्तेजन द्यायचं हे आजीचं वैशिष्ट्यच होतं. आयुष्यात इतकं काही भोगूनही आजीनी स्वतःचं दुःख कधीही उगाळलं नाही. तिच्या आयुष्याकडून अपेक्षादेखिल खूप साध्या होत्या. पण स्वत:च घर हा तिचा अगदी वीक पॊईंट होता. आजीला ’जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणं अजिबात आवडत नसे. "असं म्हणावं अशी वेळ अजूनतरी माझ्या अयुष्यात आली नाही. जेव्हा स्वतःचं घर होईल तेचा मी हे गाणं रेकॊर्ड करून घेईन आणि मग सतत तेच ऐकत बसेन. एकदा का आपलं स्वतःचं घर झालं, की राजीव गांधी एका बाजूला आणि मी एका बाजूला" (म्हणजे पंतप्रधानांइतकी सुखी) असं ती म्हणत असे. तिचं हे स्वप्न मात्र ती असताना पूर्ण झालं नाही. वयाच्या अवघ्या ५८व्या वर्षीच आपलं स्वप्न अर्धवटच ठेवून ती गेली. मी चौथीत असताना शिष्यवृत्तीच्या परिक्षेला बसले होते. तेव्हा सगळे प्रश्न उतरवून घ्यायचे आणि मग त्यापुढे उत्तरं लिहायची असं आम्हाला शाळेत सांगितलं होतं. मला लिखाणाचा फार कंटाला यायच. तेव्हा आजी दररोज मला सगळे प्रश्न dictate करत असे. आणि मग मि ते सोडवत असे. तिने पूर्ण वर्षभर माझा असा अभ्यास करून घेतला. परंतु दुर्दैवाने मला शिष्यवृत्ती मिळली तेव्हा आजी या जगात नव्हती. त्यादिवशी निकाल कळल्या-कळल्या धो धो रडल्याचं मला आजही आठवतं. आज चतुर्थी. आजीला जाऊन आज बरोबर १७ वर्ष झाली. या सतरा वर्षात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. कधीही अगदी खचून गेल्यासारखं झालं की आजीची शिकवण आठवते आणि आपोआपच सगळं frustration कुठच्या कुठे पळून जातं. सगळ्या संकटांचा हिमतीने सामना करणारी कतृत्त्ववान आजी नेहेमीच माझा आदर्श आहे.

सोमवार, एप्रिल ०२, २००७

कळत-नकळत

काल खूप वर्षांनी कळत-नकळत बघितला परत. १२-१३ वर्षांपूर्वी बघितला तेव्हा मला खूपच आवडलेला हा सिनेमा काल मात्र मला आवडला नाही. सगळ्या कलाकारांचा उत्तम अभिनय मनात भरलाच परत एकदा. पण फार अस्वस्थ व्हायला झालं.
एक सुंदर सुखी कुटुंब. हम दो हमारे दो. मनोहरच्या जीवनात घडणारी चूक सगळ्या घरालाच मुळापसून हादरवून सोडते. उमाचा घर सोडून जाण्याचा निर्णयही अगदी पटण्यासारखाच. पण खरी बोच सुरू होते ती तिथूनच. खरंतर अगदी रस्त कारणासठी ती घर सोडून येते. तरीही तिला सतत अपराधी का वाटत रहावं? उमाचे आई-भाऊ सर्वजण तिलाच समजून घ्यायला का सांगतात? ज्या व्यक्तीने आपल्याशी प्रतारणा केली त्या व्यक्तीबरोबर राहू नये अस तिला वाटलं तर तिची काय चूक आहे? चौपाटीवर भेटलेले मुलाचे वडीलही तिला ’तुमचं एकटेपण तुमच्या स्वभावामुळेच आलं असणार’ असं म्हणतात तेव्हा खरंच संताप येतो.
मनोहरच्या हातून नकळत चूक घडते हे मान्य. पण तरीही ही सहज माफ करण्याइतकी क्षुल्लक बाब आहे का? आणि खरोखरच मनोहरचं इतकं प्रेम असेल बायको मुलांवर तर मोहाच्या क्षणी त्याला त्यांची आठवण का होत नाही? पिता म्हणून तो उत्तम असेलही, पण एक नवरा म्हणून तो चुकतोच ना?
नंतर विचार आला, आता ह्या चित्रपटालाही १७ वर्षं होऊन गेली. त्यावेळी कदाचित ’मुलांसाठी तरी तिने समजून घ्यायला हवं’ अशी भूमिका कदाचित सर्वांना योग्य वाटत असेल. पण आजही अशाच गोष्टी चक्क आपल्या सभोवताली घडताना दिसतात. ब‌‍र्याच वेळा मुलांसाठी म्हणून लग्न न मोडणारे स्त्री- पुरुष बघितले की वाटतं किती त्रासदायक आहे हे सारं.... मुलांना आई वडील दोघांचं प्रेम मिळावं म्हणून केवढा मोठा त्याग करत असतील लोक..... आणि जी व्यक्ती कळून-सवरून चुका करते तिचं/त्याचं काय? त्यांच्या जोडीदारांनी का हे सहन करत रहावं? आणि मोठेपणी त्या मुलांना वस्तुस्थिती कळल्यानंतर ती आपल्या आई-वडलांना समजून घेणार नाहीत का?
चित्रपटामधे अगदी घटस्फोट झाल्यानंतरही मनोहर उमा एकत्र रहाण्याचा निर्णय घेतात. पण तो शेवट चित्रपटात ठीक आहे.
प्रत्यक्ष जीवनात कळत - नकळत घडणारी चूकही आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते हे कळणं हेच खरं या चित्रपाटचं मर्म आहे असं मला वाटतं.