काल खूप वर्षांनी कळत-नकळत बघितला परत. १२-१३ वर्षांपूर्वी बघितला तेव्हा मला खूपच आवडलेला हा सिनेमा काल मात्र मला आवडला नाही. सगळ्या कलाकारांचा उत्तम अभिनय मनात भरलाच परत एकदा. पण फार अस्वस्थ व्हायला झालं.
एक सुंदर सुखी कुटुंब. हम दो हमारे दो. मनोहरच्या जीवनात घडणारी चूक सगळ्या घरालाच मुळापसून हादरवून सोडते. उमाचा घर सोडून जाण्याचा निर्णयही अगदी पटण्यासारखाच. पण खरी बोच सुरू होते ती तिथूनच. खरंतर अगदी रस्त कारणासठी ती घर सोडून येते. तरीही तिला सतत अपराधी का वाटत रहावं? उमाचे आई-भाऊ सर्वजण तिलाच समजून घ्यायला का सांगतात? ज्या व्यक्तीने आपल्याशी प्रतारणा केली त्या व्यक्तीबरोबर राहू नये अस तिला वाटलं तर तिची काय चूक आहे? चौपाटीवर भेटलेले मुलाचे वडीलही तिला ’तुमचं एकटेपण तुमच्या स्वभावामुळेच आलं असणार’ असं म्हणतात तेव्हा खरंच संताप येतो.
मनोहरच्या हातून नकळत चूक घडते हे मान्य. पण तरीही ही सहज माफ करण्याइतकी क्षुल्लक बाब आहे का? आणि खरोखरच मनोहरचं इतकं प्रेम असेल बायको मुलांवर तर मोहाच्या क्षणी त्याला त्यांची आठवण का होत नाही? पिता म्हणून तो उत्तम असेलही, पण एक नवरा म्हणून तो चुकतोच ना?
नंतर विचार आला, आता ह्या चित्रपटालाही १७ वर्षं होऊन गेली. त्यावेळी कदाचित ’मुलांसाठी तरी तिने समजून घ्यायला हवं’ अशी भूमिका कदाचित सर्वांना योग्य वाटत असेल. पण आजही अशाच गोष्टी चक्क आपल्या सभोवताली घडताना दिसतात. बर्याच वेळा मुलांसाठी म्हणून लग्न न मोडणारे स्त्री- पुरुष बघितले की वाटतं किती त्रासदायक आहे हे सारं.... मुलांना आई वडील दोघांचं प्रेम मिळावं म्हणून केवढा मोठा त्याग करत असतील लोक..... आणि जी व्यक्ती कळून-सवरून चुका करते तिचं/त्याचं काय? त्यांच्या जोडीदारांनी का हे सहन करत रहावं? आणि मोठेपणी त्या मुलांना वस्तुस्थिती कळल्यानंतर ती आपल्या आई-वडलांना समजून घेणार नाहीत का?
चित्रपटामधे अगदी घटस्फोट झाल्यानंतरही मनोहर उमा एकत्र रहाण्याचा निर्णय घेतात. पण तो शेवट चित्रपटात ठीक आहे.
प्रत्यक्ष जीवनात कळत - नकळत घडणारी चूकही आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते हे कळणं हेच खरं या चित्रपाटचं मर्म आहे असं मला वाटतं.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 टिप्पणी:
पिक्चर या वेळी आवडला नाही हे ठीक पण जेव्हा आवडला होता तेव्हा तो का आवडला होता हे ऐकायलाही आवडेल!
टिप्पणी पोस्ट करा